
बीड, 01 एप्रिल (हिं.स.)। बीड स्थानिक गुन्हे शाखेने परळी येथील इराणी वस्तीत धाडसी कोम्बिंग ऑपरेशन राबवून चैनस्नॅचिंग करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील मकोका गुन्ह्यातील फरार आरोपी यांचा समावेश आहे. धारूर येथील चोरीच्या घटनेचा तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली तीन विशेष पथकांनी पाळत ठेवून पहाटे ही मोहीम फत्ते केली. पकडलेल्या आरोपींनी धारूर, आष्टी आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांच्याकडून ३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक केलेले आरोपी मूळचे श्रीरामपूर आणि भिवंडी येथील असून ते परळीत आश्रयाला होते. या कारवाईमुळे आंतरजिल्हा गुन्हेगारी टोळीचे धाबे दणाणले असून पुढील तपास धारूर पोलीस करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis