
-आंबा, भाजीपाला व फळबागांचे मोठे नुकसान; आर्थिक मदतीची मागणी
लातूर, 01 एप्रिल (हिं.स.)चाकूर तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि काही भागांतील गारपिटीच्या तडाख्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. विशेषतः आंबा, फळबागा, भाजीपाला आणि काढणीला आलेली पिके मातीमोल झाल्याने बळीराजा पुन्हा एकदा आस्मानी संकटाच्या विळख्यात सापडला आहे.
अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी आंब्याची फळे झाडावरून गळून पडली, तर काही बागांमधील झाडांच्या फांद्या मोडून मोठे नुकसान झाले. यंदा चांगल्या उत्पादनाची अपेक्षा बाळगलेल्या शेतकऱ्यांच्या आशांवर या पावसामुळे अक्षरशः पाणी फेरले गेले आहे. आधीच वाढता उत्पादन खर्च, बाजारभावातील अनिश्चितता आणि कर्जाचा डोंगर यामुळे त्रस्त असलेला शेतकरी या नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिकदृष्ट्या अधिकच कोलमडला आहे. मोठ्या कष्टाने आणि खर्च करून उभे केलेले पीक तोंडाशी आले असतानाच हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येऊ नये, यासाठी शासनाने तातडीने मदतीचा हात पुढे करावा, अशी भावना व्यक्त होत आहे.
स्थानिक प्रशासनाने त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत, पीकविमा आणि विशेष अनुदान जाहीर करावे, अशी मागणी होत आहे. मदत न मिळाल्यास शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखी परिस्थिती निर्माण होईल, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून उमटत आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis