चंद्रपूर : महिलांची रात्रकालीन कबड्डी स्पर्धा उत्साहात
चंद्रपूर, 01 एप्रिल (हिं.स.) : क्रीडा केवळ मनोरंजनाचे साधन नाही, तर शिस्त, संघभावना, जिद्द आणि आत्मविश्वास शिकवणारे माध्यम आहे, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. मैदानावर उतरलेल्या प्रत्येक महिला खेळाडूमध्ये हीच जिद्द आणि आत्मविश्वास स
चंद्रपूर :  महिलांची रात्रकालीन कबड्डी स्पर्धा उत्साहात


चंद्रपूर, 01 एप्रिल (हिं.स.) : क्रीडा केवळ मनोरंजनाचे साधन नाही, तर शिस्त, संघभावना, जिद्द आणि आत्मविश्वास शिकवणारे माध्यम आहे, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. मैदानावर उतरलेल्या प्रत्येक महिला खेळाडूमध्ये हीच जिद्द आणि आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून येत असून, ही ऊर्जा त्यांना पुढील आयुष्यात मोठ्या यशापर्यंत घेऊन जाईल, असे त्यांनी नमूद केले.

आमदार जोरगेवार यांच्या संकल्पनेतून आयोजित श्री माता महाकाली क्रीडा महोत्सव अंतर्गत भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने बाबूपेठ येथील श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी मैदान येथे जिल्हास्तरीय रात्रकालीन महिलांची खुली कबड्डी स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडली. स्पर्धेच्या समारोपासाठी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यावेळी उपमहापौर प्रशांत दानव, गटनेते चंद्रशेखर शेट्टी, नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, सायली तोंडरे, विधानसभा अध्यक्ष वंदना हातगावकर, बलराम डोडाणी, तुषार सोम आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार जोरगेवार यांनी सांगितले की, कबड्डीसारख्या पारंपरिक खेळामध्ये महिलांचा वाढता सहभाग पाहून मनापासून समाधान वाटते. आज महिला केवळ घरापुरत्या मर्यादित न राहता क्रीडा क्षेत्रातही आत्मविश्वासाने पुढे येत आहेत, ही अत्यंत सकारात्मक आणि प्रेरणादायी बाब आहे. या क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून महिलांना आपले कौशल्य सादर करण्यासाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध होत असून, अशा उपक्रमांमुळे त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत आहे.

स्पर्धेत उत्कृष्ट क्रीडा प्रदर्शन करणाऱ्या महिला खेळाडूंना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. जय भवानी (ढोलवासा) संघाने प्रथम, जय महाकाली क्रीडा (चंद्रपूर) संघाने द्वितीय, तर जय श्री राम (लाठी) संघाने तृतीय पारितोषिक पटकावले. सर्व संघांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले, तर क्रीडाप्रेमींची उपस्थितीही मोठ्या प्रमाणात होती.

----------------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande