
पालघर, 01 एप्रिल (हिं.स.)।
जिल्ह्यातील प्रसिद्ध सफेद कांदा उत्पादनावर यंदा संकटाचे सावट निर्माण झाले असून, उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. लांबलेल्या आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे जमिनीत अतिरिक्त ओलावा टिकून राहिल्याने कांद्याला अपेक्षित वाढ मिळत नसल्याचे चित्र आहे.
खरीप हंगाम आधीच नुकसानात गेल्यानंतर शेतकऱ्यांची सर्व मदार रब्बी हंगामातील कांदा पिकावर होती. मात्र, सध्याच्या हवामानामुळे कांद्याची पात करपणे, कंदाचा आकार लहान राहणे अशा समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. त्यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अनेक ठिकाणी शेतात पाणी साचून राहिल्याने पिकांच्या मुळांवर परिणाम झाला असून, योग्य वाढ न झाल्याने उत्पादन घटण्याची चिन्हे दिसत आहेत. यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवले आहे.
सफेद कांदा हे पालघर जिल्ह्याचे महत्त्वाचे पीक मानले जाते. या पिकावर अनेक शेतकऱ्यांचे उत्पन्न अवलंबून आहे. मात्र, हवामानातील बदल आणि अनियमित पावसामुळे शेतीचे गणित बिघडत चालले आहे.
दरम्यान, प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी, तसेच नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL