कासा येथे प्रथमच आदिवासी साहित्य संमेलन; ५ एप्रिलला रंगणार साहित्यसोहळा
पालघर, 01 एप्रिल (हिं.स.) :पालघर जिल्ह्यातील कासा विभागात प्रथमच आदिवासी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, रविवार, ५ एप्रिल रोजी बिरसा मुंडा हॉल येथे हा साहित्यसोहळा पार पडणार आहे. ‘अनजा सेवा संस्था, कासा’ आणि ‘आदिवासी साहित्य परिषद, पालघर’
कासा येथे प्रथमच आदिवासी साहित्य संमेलन; साहित्य-संस्कृतीला नवी दिशा


पालघर, 01 एप्रिल (हिं.स.) :पालघर जिल्ह्यातील कासा विभागात प्रथमच आदिवासी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, रविवार, ५ एप्रिल रोजी बिरसा मुंडा हॉल येथे हा साहित्यसोहळा पार पडणार आहे. ‘अनजा सेवा संस्था, कासा’ आणि ‘आदिवासी साहित्य परिषद, पालघर’ यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या संमेलनाचा उद्देश आदिवासी साहित्य, कला, संस्कृती आणि बोलीभाषांचे जतन व संवर्धन हा आहे. संमेलनात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, कवी कृष्णा राऊत, ज्ञानेश्वर गावीत, विशाल भोये यांच्यासह अनेक कवी आपली काव्यरचना सादर करणार आहेत. तसेच सुनील झळके, सखाराम दाखोरे, नितीन बोंबाडे आणि डॉ. किशोर डोके यांसारख्या साहित्यिकांचा सहभाग लाभणार आहे.

या पहिल्या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक देवचंद महाले यांची निवड करण्यात आली आहे. संमेलन दोन सत्रांत पार पडणार असून, पहिल्या सत्रात आदिवासी साहित्य, बोलीभाषा, त्यांचे संवर्धन आणि विकास या विषयांवर सखोल चर्चा होणार आहे. तर दुसऱ्या सत्रात कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, ममता गडग, माया खोतरे, चेतन अंधेर आदी कवी आपल्या रचना सादर करणार आहेत.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजेंद्र गावीत, विनोद निकोले, विलास तरे, माजी आमदार अमित घोडा तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्षा वैदेही वाढाण उपस्थित राहणार आहेत.कासा विभागात प्रथमच होत असलेल्या या साहित्य संमेलनामुळे स्थानिक आदिवासी साहित्यिक व कवींना हक्काचे व्यासपीठ मिळणार असून, आदिवासी सांस्कृतिक चळवळीला नवी चालना मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.-------------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande