
बीड, 01 एप्रिल (हिं.स.) : राज्यातील कासार समाजाचे कुलदैवत असलेल्या कालिका देवीच्या वार्षिक यात्रेचा प्रारंभ नुकताच झाला असून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या निमित्ताने देवीच्या मंदिरावर विशेष विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
दररोज सकाळी ६ ते ७ वाजता सप्तशृंगी पाठ सुरू होत असून, दुपारी २ ते ५ या वेळेत बालव्यास अर्पित कृष्णादासजी महाराज शिवमहापुराण कथांचे निरुपण करत आहेत. सायंकाळी देवीची आरती होऊन नैवेद्य नवीन मंदिराकडून जुन्या मंदिराकडे वाजतगाजत नेण्यात येतो. गुरुवारी रात्री १० वाजता कालिका देवीच्या नवीन मंदिराकडून जुन्या मंदिराकडे छबिना काढण्यात येणार असून फटाक्यांची आतषबाजीही होणार आहे. भाविकांसाठी प्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती मंदिराचे अध्यक्ष शिवाजी काटकर व सचिव ऍड. भानुदास सोनाजीराव पाटील यांनी दिली.
पौर्णिमेच्या दिवशी समाजबांधवांचे स्वागत, गुणवंतांचा सत्कार व संस्थानाच्या कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी आमसभा आयोजित करण्यात आली असून, सभेचे अध्यक्षस्थानी घोटण संस्थानचे कोषाध्यक्ष रमेश रासणे हे अध्यक्ष राहणार आहेत.
नेकनूर येथील वार्षिक यात्रोत्सवाला महाराष्ट्रभरातून कासार समाजाचे भाविक दर्शनाला येतात. यंदा भाविकांसाठी निवास, नाष्टा आणि भोजनव्यवस्था आराधनेच्या माध्यातून करण्यात आली असून, कुलस्वामिनीचा कुलाचार, समाजाचे प्रश्न व संस्थानाच्या विकासावर विचारमंथनही होणार आहे.
राज्यात शिरूरकासार, घोटण, डिग्रस, कनकशिळ येथेही कालिका देवीच्या उत्सवाचे आयोजन होत असले तरी नेकनूर येथील शक्तिपीठ मुख्य असून, समाजबांधव संघटित होऊन देवीची उपासना करतात.------------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis