
बीड, 01 एप्रिल, (हिं.स.)। वाचन संस्कृती काल होती, आज आहे, उद्याही राहणार आहे, चिंता करण्याचे कारण नाही. प्रकाशित केलेल्या ग्रंथाच्या लाखो प्रती विकल्या जात असतील. ग्रंथ व्यवहार चालूच असतील, वाचक वर्ग कमी झाला नसून, तो इतर माध्यमांकडे वळला आहे. तो वाचतोय मोबाइलमधल्या विविध अॅपमधून प्रकाशित होणाऱ्या ग्रंथांची आकडेवारी आणि वाचकांची आकडेवारी पाहता ग्रंथ चळवळीस कसलाच धोका नाही, असे प्रतिपादन माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे यांनी गेवराई येथे ग्रंथमहोत्सव च्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.
अध्यक्षस्थान माजी आमदार अमरसिंह पंडित हे उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. गव्हाणे म्हणाले, की, पुस्तके ही क्रांतीचे दूत म्हणून कार्य करत असतात, म्हणून पुस्तक कधीही संपणारी गोष्ट नाही, पुस्तके आणि वाचन संस्कृती जगण्याचा अविभाज्य घटक आहे. व्यासपीठावर माजी प्राचार्य अशोक नाईकवाडे, ग्रंथालय संघाचे अध्यक्ष सुधीर चाटे, गीरवलकर, डॉ. वीर हे होते.
गेवराई येथील ग्रंथ दिंडी पूजन नगराध्यक्ष गीता पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बीड जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष सुधीर चाटे, गेवराई शहरातील सेन्ट झेवीर्स हायस्कूल गेवराई, शारदा विद्या मंदिर गेवराई, न्यू हायस्कूल गेवराई, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा मुलांची, कस्तुरबा गांधी विद्यालय गेवराई, तालुक्यातील ग्रंथालय पदाधिकारी उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis