जळगाव जिल्ह्यात ५ एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचे सावट
जळगाव, 01 एप्रिल (हिं.स.) | आगामी काही दिवस जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाची स्थिती राहणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, आगामी ५ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज असून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. य
जळगाव जिल्ह्यात ५ एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचे सावट


जळगाव, 01 एप्रिल (हिं.स.) | आगामी काही दिवस जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाची स्थिती राहणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, आगामी ५ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज असून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे. हवामान विभागाने १ ते ३ एप्रिल दरम्यान ‘यलो अलर्ट’ जारी केला असून या कालावधीत पावसाची तीव्रता अधिक राहू शकते. त्यानंतर ४ आणि ५ एप्रिल रोजीही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे, केवळ पाऊसच नव्हे तर गारपीट आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमालाची सुरक्षित साठवणूक करावी तसेच नागरिकांनी आवश्यक तेवढ्याच कामासाठी घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दरम्यान, अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात तापमानात घट झाली आहे. मागच्या दोन दिवसात तापमानात ४ अंशापर्यंतची घसरण झाली आहे. यामुळे उष्णतेच्या तडाख्यातून जळगावकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. काल मंगळवारी जळगावचे कमाल तापमान ३५.६ अंश इतके होते. रात्रीच्या तापमानातही घट झाली आहे. मंगळवारी किमान तापमान १९ अंशावर होते. दरम्यान आगामी पाच दिवस तापमान सरासरी ३६ ते ३८ अंशापर्यंत राहण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande