
परभणी, 01 एप्रिल (हिं.स.)। परभणी रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 व 3 वर जाण्यासाठीची महत्त्वाची लिफ्ट गेल्या दोन महिन्यांपासून बंद असल्याने ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने प्रवाशांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. परभणी रेल्वे स्थानक हे महत्त्वाचे जंक्शन असून दररोज सुमारे 70 रेल्वेगाड्यांची वर्दळ येथे असते. हजारो प्रवासी या स्थानकाचा वापर करतात. मात्र, प्रवाशांच्या मूलभूत सोयी-सुविधांकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून प्लॅटफॉर्म 2 व 3 वर जाण्यासाठी लिफ्ट व एक्सलेटरची सुविधा अपुरी व असुविधाजनक ठरत आहे. एक्सलेटर स्थानकाच्या एका टोकाला असल्याने प्रवाशांना मोठी पायपीट करावी लागते. त्यातच लिफ्ट बंद असल्याने ज्येष्ठ व दिव्यांग प्रवाशांना जिन्यांचा वापर करणे भाग पडत असून त्यांना शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. तीन महिन्यांपूर्वी लिफ्टची सुविधा सुरू करण्यात आली होती. मात्र, ती अल्पावधीतच वारंवार बंद राहू लागली आणि गेल्या दोन महिन्यांपासून पूर्णपणे बंद आहे. लिफ्टसमोर केवळ ‘बंद’ असा फलक लावण्यात आला असून दुरुस्तीबाबत कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नाही. या प्रकारामुळे संतप्त प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाच्या उदासीनतेवर टीका होत आहे. हजारो प्रवाशांचे हाल होत असताना संबंधित अधिकारी निष्क्रिय असल्याचा आरोप केला जात आहे. लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष या गंभीर समस्येकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनीही दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. कोणतीही ठोस पावले न उचलल्याने परभणी रेल्वेस्थानकावरील प्रवाशांच्या अडचणी वाढत असून सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis