
डोंबिवली, 01 एप्रिल (हिं.स.)। पाण्याचा एकही थेंब येत नाही. पाणी समस्या किती दिवस सहन करायची ? आम्ही पाणी बिल भरतो, मग पाणी का मिळत नाही ? असे अनेक प्रश्न निवासी भागातील नागरिकांनी थेट एमआयडीसी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना विचारला. गेले तीन चार दिवस पाणी येत नाही याचे काय कारण असा प्रश्नही विचारण्यात आला. मात्र तांत्रिक बिघाड असल्याने कमी दाबाने काही दिवस पाण्याचा प्रॉब्लेम आहे पण असे नेहमी होत नाही असे एमआयडीसी अधिकाऱ्यांनी सांगितले. बुधवारी एमआयडीसी कार्यालयात रहिवाशी व मनसेने धडक मोर्चा काढला. यावेळी महिलावर्ग प्रचंड संतापल्या होत्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोकसभा सचिव राहुल कामत, शहर सचिव अरुण जांभळे, विभाग अध्यक्ष संजय चव्हाण, विभाग सचिव अजय घोरपडे, शाखा अध्यक्ष योगेश माने, उपशाखा अध्यक्ष शाम फिसके यांच्यासह डोंबिवली निवासी भागातील रहिवाशी यानी डोंबिवली एमआयडीसी कार्यालयावर मोर्चा काढला.
एमआयडीसी कार्यालयाच्या आवारात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या मोर्च्यात काही ज्येष्ठ नागरिकहि सहभागी झाले होते. पाणी नाही तर जगायचं कस ? असा प्रश्न येथील रहिवाशांनी अधिकाऱ्यांना विचारला. यावर अधिकाऱ्यांनी तांत्रिक बिघड आल्याचे सांगत यापुढे ही समस्या येणार नाही असे मोर्चेकऱ्यांना आश्वासन दिले.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi