
बीड, 01 एप्रिल, (हिं.स.)। तालुक्यातील आणि परिसरातील ग्रामीण भागात सध्या बटाटा काढणीच्या कामांनी वेग घेतला आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करत शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने बटाटा पीक जोपासले असून, आता काढणीला सुरुवात झाल्याने शिवारात मजुरांची मोठी लगबग पाहायला मिळत आहे.
काही शेतकरी बटाटा पीक घेतात. येथील काळी कसदार जमीन आणि उपलब्ध पाणीसाठ्याच्या जोरावर अनेक शेतकरी नगदी पीक म्हणून बटाट्याला पसंती देतात. रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर बटाट्याची लागवड केली जाते. यंदाही अनेक शेतकऱ्यांनी बटाट्याची लागवड केली होती. आता पीक परिपक्व झाल्याने काढणीचे काम सुरू झाले आहे. सध्या परिसरात बटाटे काढण्यासाठी मजुरांची मोठी टंचाई भासत असली, तरी उपलब्ध मजुरांच्या साह्याने कामे उरकून घेण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. काही ठिकाणी काढणी सुरू झाली असली तरी बाजारपेठेत मिळणाऱ्या भावाबद्दल शेतकऱ्यांमध्ये धाकधूक आहे. वाहतूक खर्च, खते, औषधे आणि मजुरीचा वाढलेला खर्च पाहता, बटाट्याला रास्त भाव मिळावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. 'आम्ही रात्रंदिवस मेहनत करून पीक घेतले आहे. आता शासनाने आणि व्यापाऱ्यांनी योग्य भाव दिल्यास आमची मेहनत सार्थकी लागेल,' अशी भावना एका शेतकऱ्याने व्यक्त केली.
ट्रॅक्टरच्या साह्याने बटाटे जमिनीबाहेर काढले जात असून, त्यानंतर महिला मजूर ते वेचून गोण्यांमध्ये भरण्याचे काम करत आहेत. सकाळपासूनच शेतकरी सहकुटुंब शेतात राबत असल्याचे चित्र लिंबागणेशच्या शिवारात दिसत आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis