जोतिबा डोंगरावर चैत्र पौर्णिमेची यात्रा उत्साहात
वाडी रत्नागिरी येथे सात लाखाहून अधिक भाविकांची उपस्थिती कोल्हापूर, 01 एप्रिल (हिं.स.) : अखंड महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून आलेल्या सात लाखाहून अधिक भाविकांच्या उपस्थितीत जोतिबा डोंगरावरील चैत्र पौर्णिमेची वार्षिक यात्रा भव्यतेने प
श्री जोतिबा चैत्र पौर्णिमा यात्रा


वाडी रत्नागिरी येथे सात लाखाहून अधिक भाविकांची उपस्थिती

कोल्हापूर, 01 एप्रिल (हिं.स.) : अखंड महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून आलेल्या सात लाखाहून अधिक भाविकांच्या उपस्थितीत जोतिबा डोंगरावरील चैत्र पौर्णिमेची वार्षिक यात्रा भव्यतेने पार पडली. संपूर्ण डोंगर ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषाने आणि गुलालाच्या उधळणीने न्हालेला दिसला.

यात्रेच्या मुख्य दिवशी पहाटे श्रींचा अभिषेक, शासकीय पूजा, दुपारी मानाच्या सासनकाठ्यांचे पूजन आणि मिरवणूक, तसेच सायंकाळी यमाई देवीच्या भेटीसाठी पालखी मिरवणूक अशा पारंपरिक धार्मिक विधी पार पडले. या वर्षी सासनकाठ्यांचे पूजन राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते पार पडले, कारण पालक मंत्री उपस्थित राहू शकले नाहीत.जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, प्रांताधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि देवस्थान समितीचे अनेक मान्यवर उपस्थित होते. डोंगरावर पिण्याचे पाणी, अन्नछत्र, दर्शन रांग, पार्किंग आणि आरोग्य सुविधा यासह सामाजिक संस्थांनी भाविकांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्थापन केले.

यात्रा प्लास्टिकमुक्त ठेवण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम राबवली. तसेच, सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही, पोलीस बंदोबस्त, आपत्ती व्यवस्थापन, रक्तदान व आरोग्य शिबीर, मोफत बस सेवा आणि लाईव्ह दर्शनाची सोय करण्यात आली होती. सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील १०८ मानाच्या सासनकाठ्या ढोल-ताशांच्या आणि हलगीच्या कडकडाटात सहभागी झाल्या. भाविक गुलाल-खोबऱ्याच्या उधळणीत न्हाल्यामुळे संपूर्ण डोंगर भक्ती आणि रंगात बुडालेला दिसला.

------------------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande