ठाणे महानगरपालिकेने केली 878 कोटी रुपयांच्या विक्रमी मालमत्ता कराची वसुली
ठाणे, 01 एप्रिल, (हिं.स.)। ठाणे महापालिकेमार्फत सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये 878.37 कोटी रुपये इतका विक्रमी मालमत्ता कर संकलित करण्यात आला आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता 915 कोटी इतके अर्थसंकल्पीय उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते. या उद
ठाणे महानगरपालिकेने केली 878 कोटी रुपयांच्या विक्रमी मालमत्ता कराची वसुली


ठाणे, 01 एप्रिल, (हिं.स.)। ठाणे महापालिकेमार्फत सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये 878.37 कोटी रुपये इतका विक्रमी मालमत्ता कर संकलित करण्यात आला आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता 915 कोटी इतके अर्थसंकल्पीय उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते. या उद्दिष्टाच्या 96 टक्के एवढा मालमत्ता कर संकलीत करण्यात महापालिकेस यश मिळाले आले. ठाणे महापालिका क्षेत्रातील करदात्यांनी दिलेल्या या प्रतिसादाबद्दल महापौर शर्मिला पिंपळोलकर, महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी करदात्यांचे आभार मानले आहेत.

मागील सन 2024-25 मध्ये रु. 810 कोटी कर संकलन झाले होते. त्याच्या तुलनेत यावर्षी रु. 68.37 कोटी अधिक महसूल प्राप्त झाला आहे.

*करवसुलीसाठी केले अथक प्रयत्न*

मालमत्ता कर संकलनात वाढ होण्यासाठी महापालिकेमार्फत विविध प्रभावी उपाययोजना राबविण्यात आल्या, त्यामध्ये आर्थिक वर्षाच्या प्रारंभीच ऑनलाईन देयके उपलब्ध करून देणे, करदात्यांना तात्काळ प्रिंट देयके वितरण करण्यात आले.

तसेच ऑनलाईन तसेच सर्व संकलन केंद्रांवर कर भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. धनादेश, डीडी, डेबिट/क्रेडिट कार्डद्वारे भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली. जानेवारी ते मार्च 2026 दरम्यान सुट्टीच्या दिवशीही संकलन केंद्र सुरू ठेवण्यात आली होती.ऑटो रिक्षाद्वारे जनजागृती, गृहनिर्माण संस्थांमध्ये मोबाईल व्हॅन कॅम्प, एसएमएसद्वारे कर भरण्याचे स्मरण देण्यात आले.

त्याचबरोबर, ज्या करदात्यांनी विहीत मुदतीत कर भरलेला नाही, अशा करदात्यांच्या मालमत्तेवर वॉरंट बजावून जप्ती, सेवा खंडीत करणे व इतर कारवाई करण्यात आली.

मालमत्ता करवसुलीबाबत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी वरिष्ठ स्तरावर नियमीत आढावा घेऊन मार्गदर्शन केले. तसेच, प्रभाग स्तरावरील उप आयुक्त, सहायक आयुक्त, कर निरीक्षक, वसुली लिपीक व सर्व कर्मचारी यांनी मालमत्ता कर संकलनाकरिता अथक प्रयत्न केले. मालमत्ता कराची वसुली प्रभावीपणे करण्यासाठी समाज माध्यम व प्रसार माध्यमांचाही उपयोग झाल्याची माहिती उपायुक्त (मालमत्ता कर) जी. जी. गोदेपुरे यांनी दिली.

*डिजिटल भरणा करण्यास करदात्यांची पसंती*

ठाणे महापालिकेने करदात्यांना कर भरणे सुलभ व्हावे यासाठी तंत्रज्ञानावर आधारित पर्याय उपलब्ध करुन दिले. त्यामुळे 87.37% मालमत्ता कर हा डिजीटल व इतर माध्यमातून संकलित झाला आहे. त्यामुळे शासनाने डिजिटल इंडिया या उपक्रमासही महापालिकेच्या कृतीने सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

*प्रभागनिहाय कर संकलन (कोटी रु.*)

1. उथळसर – 52.58

2. नौपाडा-कोपरी – 97.06

3. कळवा – 27.76

4. मुंब्रा – 45.03

5. दिवा – 43.43

6. वागळे इस्टेट – 35.27

7. लोकमान्य सावरकरनगर – 31.71

8. वर्तकनगर – 120.40

9. माजिवडा-मानपाडा – 236.51

10. मुख्यालय व इतर – 188.62

*एकूण : 878.37 कोटी*

*तक्ता २ -मालमत्ता कर संकलनाचे प्रकार*

*कर भरण्याचे मार्ग- संकलनाची टक्केवारी*

*धनादेश / डीडी – 55.67%*

*ऑनलाईन – 31.68%*

*रोख – 12.63%*

*डेबिट / क्रेडिट कार्ड – 0.02%*

सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता कराची देयके दि. 01 एप्रिल 2025 रोजी तयार करून एसएमएस व ऑनलाईन लिंकद्वारे करदात्यांना उपलब्ध करून देण्यात आली होती. या सुविधेला ठाणेकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

नवीन आर्थिक वर्षासाठी दिलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी मालमत्ता कर विभाग नियोजनबद्ध प्रयत्न करेल, असा विश्वास महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande