
वृंदावन, 10 मार्च (हिं.स.) : उत्तरप्रदेशच्या वृंदावनमध्ये आज, शुक्रवारी दुपारी यमुना नदीत मोठा अपघात घडला. पंजाबच्या मुक्तसर येथून आलेल्या भाविकांनी भरलेली मोटर बोट असंतुलित होऊन उलटली आणि सर्व प्रवासी नदीत बुडाले. त्यापैकी 10 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत.
यासंदर्भातील माहितीनुसार, पंजाबहून आलेले सुमारे 32 भाविक या बोटीत होते. हे सर्व भाविक सकाळीच वृंदावन येथे पोहोचले होते आणि निधिवनाचे दर्शन घेतल्यानंतर यमुना नदीत पर्यटनासाठी गेले होते. केशीघाट येथे ते मोटर बोटीत बसले होते. अपघाताबाबत प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, मांट पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पॅंटून पुलाला (पीपांचा पूल) बोट धडकली आणि त्यानंतर ती उलटली. यात बोटीत बसलेले सर्व 32 जण नदीत पडले. घटनेनंतर तातडीने पोलीस आणि स्थानिक पाणबुड्यांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. आतापर्यंत 10 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून सुमारे 10 जणांना सुरक्षित वाचवण्यात यश आले आहे. उर्वरित प्रवाशांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरूच आहे.घटनास्थळी मोठी गर्दी झाली असून परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या असून वाचवलेल्या भाविकांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात येत आहे.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी