
नागपूर. 10 एप्रिल (हिं.स.) : धुरंधर चित्रपटामुळे देशभरात प्रचंड लोकप्रिय झालेला अभिनेता रणवीर सिंग शुक्रवारी नागपुरात दाखल झाला. नागपुरात पोहोचताच त्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्याने सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. तसेच रेशीमबागेत जाऊन डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरूजींच्या समाधीवर जाऊन पुष्पांजली अर्पण केली.
यासंदर्भातील माहितीनुसार अभिनेता रणबीर सिंगचे शुक्रवारी दुपारी 4 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. त्याच्यासोबत 3जणांची टीम होती. विमानतळावरून तो थेट महाल परिसरातील संघ मुख्यालयात पोहोचला. संघ मुख्यालयात झालेल्या भेटीत रणवीर सिंगने आपल्या धुरंधर चित्रपटाबाबत माहिती दिली. यावेळी त्याने संघाची कार्यपद्धती तसेच विविध सेवाकार्यांविषयीही जाणून घेतले. जवळपास दीड तास तो संघ मुख्यालयात होता.
यानंतर रणवीर सिंग रेशीमबाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर येथे गेला. तेथे त्याने आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळिराम हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोलवलकर (गुरुजी) यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. तसेच, तेथील संघ पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत ‘चित्रभारती’ या संघप्रणित संस्थेबाबतही माहिती घेतली.भेटीनंतर रणवीर सिंग पुन्हा नागपूर विमानतळाकडे रवाना झाला आणि रात्री सुमारे 8.15 वाजता मुंबईकडे प्रयाण केले.
अभिनेता रणवीर सिंग याची सुरूवातीपासूनच संघाशी वैचारिक जवळीक आहे. यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रणवीर सिंग याने सोशल मिडीत व्हिडीओ अपलोड करून संघाच्या 100 वर्षातील त्याग, योगदान, बलिदान आणि वाटचालीचे कौतुक केले होते. तसेच संघ शताब्दी निमित्त त्याने अभिष्टचिंतन देखील केले होते.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी