
जयपूर,10 एप्रिल (हिं.स.) : भारतीय सेनेने ‘अभ्यास ब्रह्मास्त्र’ दरम्यान राजस्थानातील पोखरण फील्ड फायरिंग रेंजमध्ये आपल्या अत्याधुनिक युद्धक्षमतेचे प्रभावी प्रदर्शन केले. या सरावातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे एएच-64-ई अपाचे अटॅक हेलिकॉप्टरचा पहिल्यांदाच करण्यात आलेला लाईव्ह फायरपावर डेमो होय.
या हेलिकॉप्टर्सने हेलफायर मिसाइल, रॉकेट्स आणि 30 मिमी तोफेच्या साहाय्याने अचूक हल्ले करत आपली घातक क्षमता सिद्ध केली. विशेष म्हणजे, अतिशय धोकादायक परिस्थितीत जमिनीवरील सैनिकांसोबत समन्वय साधून काम करण्याची त्यांची क्षमता या सरावात स्पष्टपणे दिसून आली. भारतीय सेनेला पहिले एएच-64ई अपाचे हेलिकॉप्टर जुलै 2025 मध्ये प्राप्त झाले होते. सध्या हे हेलिकॉप्टर जोधपूर येथे तैनात असून ते 451 आर्मी एव्हिएशन स्क्वाड्रनचा भाग आहेत. अपाचे हे जगातील सर्वात प्रगत अटॅक हेलिकॉप्टर मानले जाते.या सरावादरम्यान अपाचेने लक्ष्य पटकन ओळखून अचूक हल्ला करण्याची क्षमता दाखवली. त्यातील प्रगत सेन्सर्स, फायर कंट्रोल सिस्टम आणि रिअल-टाइम डेटा लिंक यामुळे युद्धक्षेत्रातील माहिती त्वरित प्रभावी कारवाईत रूपांतरित होते.
अपाचे हेलिकॉप्टरमध्ये 11 किमीपर्यंत मारक क्षमता असलेल्या हेलफायर अँटी-टँक गाइडेड मिसाइल्स बसवण्यात आलेल्या आहेत. तसेच, हे हेलिकॉप्टर स्पाइक ATGM च्या नॉन-लाइन-ऑफ-साइट (एनएलओएस) आवृत्तीचाही वापर करू शकते. याशिवाय, अपाचे स्टिंगर हवा-ते-हवा मिसाइल्ससह सुसज्ज असून त्यात 4 पॉड्स बसवता येतात. प्रत्येक पॉडमध्ये 19 (70 मिमी) रॉकेट्स असतात. हे रॉकेट्स एपीकेडब्ल्यूएस किटच्या मदतीने गाइडेड वेपनमध्ये रूपांतरित करता येतात. अपाचे हेलिकॉप्टरमध्ये 30 मिमी ऑटोमॅटिक चेन गन देखील आहे, जी को-पायलट फक्त लक्ष्य पाहून नियंत्रित करू शकतो. हे हेलिकॉप्टर 1986 मध्ये अमेरिकन सेनेत समाविष्ट झाले होते आणि 1989 मध्ये पनामा येथे पहिल्यांदा युद्धात वापरण्यात आले.
त्यानंतर इराक, कोसोवो यांसारख्या अनेक युद्धांमध्ये याचा वापर झाला आहे. भारतीय वायुसेनेनेही पूर्व लडाखमधील तणावाच्या काळात या हेलिकॉप्टरची उच्च उंचीवर तैनाती केली होती.दोन 1,690 शाफ्ट हॉर्सपॉवर इंजिन्सवर चालणारे अपाचे हेलिकॉप्टर 20,000 फूट उंचीपर्यंत उड्डाण करू शकते आणि ताशी 365 किमी वेग गाठू शकते. यामध्ये एएन/एपीजी-78 लॉन्गबो फायर कंट्रोल रडार बसवण्यात आला आहे, जो 360 अंश कव्हरेज प्रदान करतो.तसेच, हेलिकॉप्टरच्या पुढील भागात टीएडीएस (टार्गेट अॅक्विझिशन अँड डिझिग्नेशन सिस्टम) बसवण्यात आले असून, कोणत्याही प्रकाश परिस्थितीत लक्ष्य ओळखून अचूक हल्ला करण्याची क्षमता यामुळे मिळते.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी