

पणजी, 10 एप्रिल (हिं.स.)। भारताची युवाशक्ती देशाला 'विकसित भारत' संकल्प साकारण्याच्या दिशेने नेईल, असे प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केले आहे. ते पणजी येथे गोवा विद्यापीठ, आयआयटी, गोवा आणि इंडिया इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ लीगल एज्युकेशन अँड रिसर्च (आयआययूएलईआर), गोवा च्या विद्यार्थ्यांना संबोधित करत होते.
शैक्षणिक संकुलांमधील नवोन्मेष आणि संशोधन जागतिक समस्यांवर उपाययोजना शोधून काढत आहेत आणि संशोधन आणि स्टार्टअप्सच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन समस्यांचे निराकरण होऊन जीवन सुकर होत आहे, असे त्यांनी नमूद केले. 2047 पर्यंत भारताला विकसित करण्याची जबाबदारी आता युवा वर्गाची आहे, यावर त्यांनी भर दिला. जो माणूस आशा सोडतो तो पुढे जाऊ शकत नाही, यशासाठी निर्धार, ध्येयाची स्पष्टता आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असते, असेही लोकसभा अध्यक्षांनी सांगितले.
भारतातील युवा वर्गाने लोकशाही प्रक्रियांमध्ये राजकीय सहभाग घेण्यापासून मागे हटू नये, असे सांगत बिर्ला यांनी देशाचे राजकीय भविष्य घडवण्यासाठी युवा वर्गाच्या सखोल आणि अधिक चैतन्यदायी सहभागाचे आवाहन केले. केवळ मतदान करणे पुरेसे नाही, तर तरुणांनी शासन आणि प्रशासनामध्ये उत्तरदायित्व सुनिश्चित केले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. स्वातंत्र्यलढ्यापासून आजपर्यंत प्रत्येक आव्हानावर मात करण्यात तरुणांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे त्यांनी नमूद केले. त्यांचे योगदान आपल्याला सातत्याने प्रेरणा देत आहे. नवीन विचार, नवीन बदल आणि नवीन दिशा नेहमीच तरुणांकडूनच आल्या आहेत, असेही ते म्हणाले.
युवकांच्या सक्रिय आणि उत्साही सहभागातून, लोकशाही अधिक बळकट बनते, असे सांगत, तसेच स्थानिक प्रशासनापासून ते संसदेपर्यंत, संवाद आणि चर्चा यातून, नव्या दिशा मिळतात, हे अधोरेखित करत, बिर्ला यांनी प्रशासन अधिक पारदर्शक, लोक केंद्री आणि जबाबदार होण्यासाठी, युवकांचा सहभाग वाढवण्यावर भर दिला. धोरणनिर्मितीत युवकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे, कारण त्यांच्याशिवाय धोरणे पूर्णच होऊ शकणार नाहीत, असेही त्यांनी अधोरेखित केले. जितके अधिक लोक प्रशासनात सहभागी होतील, तेवढा अधिक सकारात्मक परिणाम धोरण आखणीवर होईल, असेही ते म्हणाले. विविध क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढत असल्याचा उल्लेख करत, अनेक संवैधानिक संस्था, विधिमंडळ संस्था आणि प्रशासनात महिलांच्या सहभागामुळे देश मजबूत होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
भारतातील युवा शक्ती, जागतिक आव्हानांवर तोडगा काढण्यात आघाडीवर असल्याचे सांगत, जगभरात भारतीय युवा अनेक क्षेत्रांचे नेतृत्व करत असल्याचेही त्यांनी नमूद केले आणि हीच आपली खरी ताकद असल्याचे ते म्हणाले. किंबहुना, भारताची खरी क्षमता, युवा लोकसंख्या हीच असून, देशाच्या आशा त्यांच्यावर आहेत, असेही ते पुढे म्हणाले. दृढनिश्चय, स्पष्ट उद्दिष्ट, कठोर परिश्रम यातून प्रत्येक लक्ष्य साध्य केले जाऊ शकते, असेही बिर्ला यांनी सांगितले.
आपल्या भाषणाच्या शेवटी, बिर्ला यांनी विद्यार्थ्यांना दृढनिश्चयाने अभ्यास करण्याचा सल्ला दिला. आपल्याकडे उद्दिष्टाची स्पष्टता आणि योग्य दूरदृष्टी असावी तसेच सातत्याने परिश्रम करण्याची तयारी हाच मार्ग यशाकडे नेणारा आणि देशाला अधिक भक्कम तसेच विकसित बनवणारा आहे, असे त्यांनी सांगितले.
गोवा विधानसभेचे अध्यक्ष डॉ. गणेश गावकर या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्याशिवाय, लोकसभेचे सरचिटणीस, उत्पल कुमार सिंह, आयआयटी गोव्याचे संचालक प्रा. हरीलाल मेनन आणि प्रा धीरेंद्र खत्री यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule