
छत्रपती संभाजीनगर, 10 एप्रिल, (हिं.स.)। 'गाडी व घर घेण्यासाठी माहेरहून पैसे आण, नाही तर जीवे दे, तुझे तोंड तिकडेच काळे कर' असे टोमणे मारून जिवंत ठेवणार नाही, अशा धमक्या आणि मारहाणीला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली . या प्रकरणी शिक्षक पतीविरुद्ध क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहे. यांचे मे २०११ मध्ये लग्न झाले होते. लग्नामध्ये दोन लाख रुपये हुंडा, पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी आणि संसारोपयोगी साहित्य देण्यात आले होते. लग्नानंतर सुरुवातीची पाच वर्षे सर्व काही
व्यवस्थित होते. त्यांना एक मुलगाही झाला. मात्र, त्यानंतर पतीने गाडी घेण्यासाठी आणि घराच्या हप्त्यासाठी माहेरून पैसे आणण्याची मागणी सुरू केली. मुलीचा संसार टिकावा म्हणून माहेरच्या लोकांनी वेळोवेळी दहा-वीस हजार रुपयांची मदत केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक इंगोले हे करीत आहेत.
आरोपी शिक्षकाचे हे दुसरे लग्न आहे. त्याची पहिली पत्नी मृत झाल्यानंतर हा विवाह झाला होता. आता त्याची दुसरी पत्नीही मृत झाली. दरम्यान, त्यांच्यातील वाद मिटवण्यासाठी यापूर्वी गावाकडे तंटामुक्ती पंचाच्या समोर त्यांना बसवले. तिथे सर्वांनी त्यांची चांगली समजूत काढली त्यानंतर तो देखील राजी होऊन यापुढे असे करणार नाही अशी कबुली दिली.
आरोपी हा गतवर्षी आजारी पडला होता. तेव्हा त्याच्या उपचारासाठी जवळपास २ लाख रुपये खर्च केले होते. तरीही माहेरून पैशांसाठी तगादा लावत होता, असे तक्रारीत म्हटले आहे. त्याला दारूचे व्यसन जडले असून अनेकदा समजावून सांगितल्यानंतरही त्याच्यात सुधारणा झाली नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis