परभणी - ऑपरेशन यात्री सुरक्षाअंतर्गत कारवाई; लाखो रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त
परभणी, 10 एप्रिल (हिं.स.)। रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’ मोहिमेअंतर्गत रेल्वे संरक्षण बल (आरपीएफ) नांदेड व लोहमार्ग पोलीस नांदेड यांच्या संयुक्त पथकाने महत्त्वपूर्ण कारवाई करत चेन स्नॅचिंगसह चार
परभणी - ऑपरेशन यात्री सुरक्षाअंतर्गत कारवाई; लाखो रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त


परभणी, 10 एप्रिल (हिं.स.)। रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’ मोहिमेअंतर्गत रेल्वे संरक्षण बल (आरपीएफ) नांदेड व लोहमार्ग पोलीस नांदेड यांच्या संयुक्त पथकाने महत्त्वपूर्ण कारवाई करत चेन स्नॅचिंगसह चार प्रकरणांतील चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

संयुक्त पथकाने प्रवाशांच्या मालमत्तेची चोरी करणार्या दोन सराईत आरोपींना अटक केली. तपासादरम्यान या आरोपींचा संबंध लोहमार्ग पोलीस ठाणे नांदेड येथे 26 फेब्रुवारी 2026 रोजी नोंदविण्यात आलेल्या उच्च मूल्याच्या चेन स्नॅचिंग प्रकरणाशी असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर 5 एप्रिल 2026 रोजी पोलीस कोठडीदरम्यान मुख्य आरोपी श्रीकांत (रा. नांदेड) याच्याकडून सुमारे 4 लाख 83 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. सखोल चौकशीत आरोपीने आणखी तीन चोरी व चेन स्नॅचिंग प्रकरणांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिली. त्यानुसार गुन्हा क्र. 425 (दि. 7 ऑगस्ट 2025) मध्ये 20 ग्रॅम चांदीचे दागिने (अंदाजे किंमत 10 हजार रुपये), गुन्हा क्र. 276 (दि. 21 मे 2025) मध्ये 26.5 ग्रॅम सोन्याचे दागिने (अंदाजे किंमत 1 लाख 40 हजार रुपये) आणि गुन्हा क्र. 27 (दि. 28 जानेवारी 2026) मध्ये 10 ग्रॅम सोन्याचे दागिने (अंदाजे किंमत 20 हजार रुपये) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या संयुक्त कारवाईतून विविध प्रकरणांतील लाखो रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. दि. 8 एप्रिल 2026 रोजी आरोपीस पोलीस कोठडीनंतर माननीय प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालय, नांदेड येथे हजर करण्यात आले असून, रेल्वे प्रशासनाने ‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’ मोहिमेअंतर्गत प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande