
रायगड, 10 एप्रिल (हिं.स.)। : माणगाव पोलीस ठाणे हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या अपघातात एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, रुद्रवली गाव हद्दीत सीएनजी पेट्रोल पंपाजवळ गोवा बाजूकडे जाणाऱ्या लेनवर सागर साहदेव शिगवण (वय ३५, रा. गणेशवाडी, पो. विर, ता. महाड) हे रस्ता ओलांडत असताना एसटी बसने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात शिगवण यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांचा मृत्यू झाला.
सदर बस (क्रमांक एमएच-20 बीएल 3814) चालकाने वाहन अतिवेगाने व निष्काळजीपणे चालविल्याचा आरोप असून, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. संबंधित चालक हा यवतमाळ जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे.
या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०७/२०२६ नोंद करण्यात आला असून मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १८४ तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१), २८१, १२५ (अ), १२५ (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय सुर्वे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)