गोव्यात इंधनाचा पुरवठा सुरळीत; एलपीजी वितरणाला प्राधान्य
- टंचाईच्या भीतीने खरेदी न करण्याचे नागरिकांना आवाहन पणजी, 10 एप्रिल (हिं.स.) : गोव्यात पेट्रोल, डिझेल आणि लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) यांचा पुरवठा सध्याच्या मागणीसाठी पूर्णपणे पुरेसा असल्याची माहिती राज्यातील तेल विपणन कंपन्यांनी (ओएमसी)
Fuel  LPG Supply Stable Goa Citizens Urged Not Engage Panic Buying


- टंचाईच्या भीतीने खरेदी न करण्याचे नागरिकांना आवाहन

पणजी, 10 एप्रिल (हिं.स.) : गोव्यात पेट्रोल, डिझेल आणि लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) यांचा पुरवठा सध्याच्या मागणीसाठी पूर्णपणे पुरेसा असल्याची माहिती राज्यातील तेल विपणन कंपन्यांनी (ओएमसी) दिली आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांचे राज्यस्तरीय समन्वयक मधुरेंद्र के. पांडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की, इंधन पुरवठ्याची स्थिती नियमितपणे तपासली जात असून लॉजिस्टिक्स सुरळीत ठेवण्यासाठी आणि वितरण गतीमान करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्यभर इंधनाचा पुरवठा अखंडित सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एलपीजी वितरणाला विशेष प्राधान्य देण्यात आले असून दररोज सुमारे 10,600 घरगुती सिलिंडर वितरित केले जात आहेत. हे प्रमाण अलीकडील भू-राजकीय घडामोडींपूर्वीच्या स्तराशी सुसंगत असून सध्याची गरज भागविण्यास सक्षम आहे. ग्राहकांना एसएमएस, मिस्ड कॉल किंवा आयव्हीआरएसद्वारे बुकिंग करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, योग्य लाभार्थ्यांपर्यंतच वितरण पोहोचावे यासाठी ‘डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड’ (डीएसी) वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकारकडून स्वयंपाकासाठी पर्यायी इंधन म्हणून पाईप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) ला प्रोत्साहन दिले जात आहे. पणजी, मडगाव आणि फोंडा येथे पीएनजी सेवा उपलब्ध असून ग्राहकांना ऑनलाइन नोंदणीची सुविधा देण्यात आली आहे.

स्थलांतरित कामगार आणि स्थानिक पत्त्याचा पुरावा नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी 5 किलोचे ‘फ्री ट्रेड एलपीजी’ (एफटीएल) सिलिंडर अधिकृत वितरकांकडून उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

इंधन पुरवठा साखळी सुरळीत ठेवण्यासाठी नियमित तपासणी केली जात असून साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाकडून कारवाई सुरू आहे. आतापर्यंत 305 ठिकाणी छापे टाकण्यात आले असून अनियमितता आढळलेल्या प्रकरणांवर कारवाई करण्यात आली आहे.नागरिकांनी इंधन टंचाईच्या अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा भीतीपोटी अतिरिक्त खरेदी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande