ह्युंदाई मोटर इंडियाने ह्युंदाई क्रेटाचे समर एडिशन केले लॉन्च
मुंबई, 10 एप्रिल (हिं.स.)। भारतातील कार निर्माता ह्युंदाई मोटर इंडियाने आपल्या लोकप्रिय एसयूव्ही ह्युंदाई क्रेटाचे नवीन समर एडिशन व्हेरिएंट बाजारात सादर केले आहे. या स्पेशल एडिशनमध्ये कोणतेही मेकॅनिकल बदल न करता अधिक आरामदायी आणि टेक्नॉलॉजी फीचर्स
Hyundai Creta Summer Edition


मुंबई, 10 एप्रिल (हिं.स.)। भारतातील कार निर्माता ह्युंदाई मोटर इंडियाने आपल्या लोकप्रिय एसयूव्ही ह्युंदाई क्रेटाचे नवीन समर एडिशन व्हेरिएंट बाजारात सादर केले आहे. या स्पेशल एडिशनमध्ये कोणतेही मेकॅनिकल बदल न करता अधिक आरामदायी आणि टेक्नॉलॉजी फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे ग्राहकांना अधिक प्रीमियम अनुभव मिळणार आहे.

नवीन क्रेटा समर एडिशन EX, EX(O), S(O), SX आणि SX प्रीमियम या विविध व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. या सर्व व्हेरिएंट्समध्ये पेट्रोल आणि डिझेल इंजिनचे पर्याय कायम ठेवण्यात आले असून क्रेटा समर एडिशनमध्ये सध्याचे १.५-लिटर पेट्रोल इंजिन आणि १.५-लिटर डिझेल इंजिन कायम ठेवण्यात आले आहे. व्हेरिएंटनुसार, दोन्ही इंजिन मॅन्युअल, IVT (CVT) आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या पर्यायांसह उपलब्ध आहेत यामुळे इंजिन आणि परफॉर्मन्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, फीचर्सच्या बाबतीत कंपनीने मोठे अपडेट्स दिले आहेत.

या समर एडिशनमधील सर्वात महत्त्वाचे अपडेट म्हणजे काही निवडक व्हेरिएंट्समध्ये डॅशकॅमचा समावेश. हा डॅशकॅम सतत ड्रायव्हिंग रेकॉर्डिंग, इमर्जन्सी इव्हेंट कॅप्चर आणि मोबाईल ऍपद्वारे व्हिडिओ डाउनलोड अशा आधुनिक फीचर्सना सपोर्ट करतो. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची भर मानली जात आहे.

SX आणि त्यापुढील व्हेरिएंट्समध्ये 10.25-इंचचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला आहे, तर SX प्रीमियम व्हेरिएंटमध्ये सराउंड व्ह्यू मॉनिटर आणि ब्लाइंड स्पॉट व्ह्यू मॉनिटर यांसारखी प्रगत पार्किंग आणि ड्रायव्हिंग सहाय्य प्रणाली उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे गाडी चालवणे अधिक सुरक्षित आणि सोयीचे होणार आहे.

एंट्री लेव्हल EX समर एडिशनमध्ये स्मार्ट की आणि पुश बटन स्टार्ट यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत. EX(O) व्हेरिएंटमध्ये LED लाईटिंग, रियर सनशेड, ड्युअल टोन स्टील व्हील्स आणि डायनॅमिक गाइडलाईन्ससह रियर कॅमेरा देण्यात आला आहे. S(O) आणि S(O) नाइट व्हेरिएंटमध्ये डॅशकॅमचा समावेश करून त्याला अधिक आकर्षक बनवण्यात आले आहे.

किंमतींच्या बाबतीत पाहता, या समर एडिशनची सुरुवात सुमारे 12.05 लाख रुपयांपासून होत असून टॉप व्हेरिएंटची किंमत जवळपास 17.88 लाख रुपयांपर्यंत जाते. विविध व्हेरिएंट्स आणि गियरबॉक्स पर्यायांनुसार किंमतीत फरक आहे.

एकूणच, ह्युंदाईने क्रेटा समर एडिशनद्वारे आपल्या लोकप्रिय एसयूव्ही मध्ये अधिक फीचर्स जोडून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः टेक्नॉलॉजी आणि सेफ्टी फीचर्समध्ये वाढ केल्यामुळे या मॉडेलची बाजारातील स्पर्धात्मकता आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे. देशभरातील ह्युंदाई डीलरशिप्सवर हे नवीन समर एडिशन आता उपलब्ध झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande