
मुंबई, 10 एप्रिल (हिं.स.)। देशातील आघाडीची रिअल इस्टेट कंपनी गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडने आर्थिक वर्ष 2026 मध्ये आतापर्यंतची सर्वाधिक कामगिरी नोंदवत बुकिंग, वसुली, ऑपरेटिंग कॅश फ्लो आणि व्यवसाय विस्तार या सर्वच क्षेत्रांत नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. सलग तिसऱ्या वर्षी कंपनीने बुकिंग व्हॅल्यूच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठा निवासी विकासक म्हणून आपले स्थान कायम राखले आहे.
कंपनीने आर्थिक वर्ष 2026 मध्ये एकूण 34,171 कोटी रुपयांचे बुकिंग व्हॅल्यू साध्य केले असून यात वार्षिक 16 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या तीन वर्षांत या आकड्यात 41 टक्क्यांच्या कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेटने वाढ झाली आहे. याचबरोबर 17,515 युनिट्सची विक्री झाली असून एकूण 27 दशलक्ष स्क्वेअर फूट क्षेत्रफळ विकले गेले आहे. चौथ्या तिमाहीतही कंपनीने 10,163 कोटी रुपयांचे विक्रमी बुकिंग नोंदवले आहे.
वसुलीच्या बाबतीतही कंपनीने उत्कृष्ट कामगिरी करत 19,965 कोटी रुपये प्राप्त केले असून ही 17 टक्के वाढ दर्शवते. ऑपरेटिंग कॅश फ्लो 7,830 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. चौथ्या तिमाहीत ऑपरेटिंग कॅश फ्लो 4,631 कोटी रुपये झाला, जो मोठी वाढ दर्शवणारा आहे. तसेच फ्री कॅश फ्लोही 626 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
व्यवसाय विस्ताराच्या दृष्टीनेही हे वर्ष कंपनीसाठी ऐतिहासिक ठरले आहे. कंपनीने 18 नवीन प्रकल्प सुरू करत 42,100 कोटी रुपयांच्या संभाव्य बुकिंग क्षमतेची भर घातली आहे, जी ठरवलेल्या उद्दिष्टाच्या दुप्पट आहे. याशिवाय 12.1 दशलक्ष स्क्वेअर फूट प्रकल्प पूर्ण करून ग्राहकांना हस्तांतरित करण्यात आले आहेत.
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव पांडे यांनी सांगितले की, भारतातील महानगरांमध्ये उच्च दर्जाच्या घरांची वाढती मागणी कंपनीच्या यशाचे मुख्य कारण आहे. त्यांनी आगामी वर्षातही हीच गती कायम ठेवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule