
- जळगाव आणि भुसावळ या दोन्ही स्थानकांवर थांबा
जळगाव, 10 एप्रिल (हिं.स.) : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी आणि रेल्वे तिकिटांच्या वेटिंग लिस्टचा त्रास लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दक्षिण भारत आणि राजस्थानला जोडणारी कोइम्बतूर–जयपूर साप्ताहिक विशेष रेल्वे सुरू करण्यात आली असून या गाडीला जळगाव आणि भुसावळ या प्रमुख स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. यामुळे उत्तर-दक्षिण प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 06181 कोइम्बतूर–जयपूर विशेष रेल्वे 9 एप्रिल ते 4 जून या कालावधीत दर गुरुवारी दुपारी 2:30 वाजता कोइम्बतूर येथून सुटणार आहे. ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी 1:35 वाजता भुसावळ आणि दुपारी 2:10 वाजता जळगाव स्थानकावर पोहोचणार आहे. त्यानंतर तिसऱ्या दिवशी दुपारी 1:25 वाजता ही गाडी जयपूर येथे दाखल होईल.तर गाडी क्रमांक 06182 जयपूर–कोइम्बतूर विशेष रेल्वे 12 एप्रिल 2026 ते 7 जून 2026 या कालावधीत दर रविवारी रात्री 10:05 वाजता जयपूर येथून सुटणार आहे. ही गाडी दुसऱ्या दिवशी रात्री 7:35 वाजता जळगाव आणि रात्री 8:10 वाजता भुसावळ स्थानकावर पोहोचेल. चौथ्या दिवशी सकाळी 8:30 वाजता ही गाडी कोइम्बतूर येथे पोहोचणार आहे.
या विशेष रेल्वेला तिरुपूर, इरोड, सेलम, काटपाडी, रेनिगुंटा, कडप्पा, गूटी, कुरनूल सिटी, काचेगुडा, निजामाबाद, नांदेड, अकोला, भुसावळ, जळगाव, नंदुरबार, उधना, वडोदरा, रतलाम, मंदसोर, चित्तोडगड, अजमेर आणि किशनगड यांसह अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.या गाडीमध्ये एकूण 18 वातानुकूलित थ्री-टायर कोच आणि 2 सामान व ब्रेक व्हॅनचा समावेश आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर