भारतामध्ये रॉयल एनफिल्ड फ्लाइंग फ्ली सी६ इलेक्ट्रिक मोटरसायकल लॉन्च
मुंबई, 10 एप्रिल (हिं.स.)। भारतीय दुचाकी बाजारात मोठ्या प्रतिक्षेनंतर रॉयल एनफिल्ड कंपनीने आपली पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल रॉयल एनफिल्ड फ्लाइंग फ्ली सी६ अधिकृतपणे लॉन्च केली आहे. ही मोटरसायकल सध्या मर्यादित स्वरूपात केवळ बेंगळुरू शहरात उपलब्ध करण्य
Royal Enfield Flying Flea C6 EV Motorcycle


मुंबई, 10 एप्रिल (हिं.स.)। भारतीय दुचाकी बाजारात मोठ्या प्रतिक्षेनंतर रॉयल एनफिल्ड कंपनीने आपली पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल रॉयल एनफिल्ड फ्लाइंग फ्ली सी६ अधिकृतपणे लॉन्च केली आहे. ही मोटरसायकल सध्या मर्यादित स्वरूपात केवळ बेंगळुरू शहरात उपलब्ध करण्यात आली असून, पुढील काही महिन्यांत टप्प्याटप्प्याने इतर शहरांमध्येही तिची विक्री सुरू केली जाणार आहे. कंपनीने याआधी २०२४ मध्ये या मॉडेलचे पहिले प्रदर्शन केले होते आणि आता अखेर ते ग्राहकांसाठी बाजारात आणण्यात आले आहे.

या इलेक्ट्रिक मोटरसायकलची एक्स-शोरूम किंमत २.७९ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. मात्र ‘बॅटरी-एज-अ-सर्व्हिस’ या पर्यायासह ग्राहकांना ती १.९९ लाख रुपयांच्या प्रारंभिक किमतीत उपलब्ध होते. या विशेष योजनेमुळे ग्राहकांना बॅटरीचा खर्च वेगळा देण्याची सुविधा मिळते, ज्यामुळे सुरुवातीचा खर्च कमी होतो. भारतीय बाजारात या बाईकचा थेट प्रतिस्पर्धी नसला तरी तिची किंमत अल्ट्राव्हायोलेट F77 या इलेक्ट्रिक स्पोर्ट्स बाईकच्या जवळपास आहे. मात्र परफॉर्मन्सच्या बाबतीत F77 अधिक शक्तिशाली मानली जाते.

फ्लाइंग फ्ली सी६ च्या डिझाइनमध्ये १९४० च्या दशकातील ‘फ्लाइंग फ्ली’ मोटरसायकलची प्रेरणा स्पष्टपणे दिसून येते. युद्धाच्या काळात वापरण्यात आलेल्या त्या क्लासिक बाईकचा रेट्रो लुक या नवीन मॉडेलमध्ये आधुनिक तंत्रज्ञानासह सादर करण्यात आला आहे. या बाईकमध्ये फोर्ज्ड अॅल्युमिनियम गर्डर फोर्क, आर्टिक्युलेटिंग मडगार्ड आणि फिन्स असलेली मॅग्नेशियम बॅटरी केसिंग यांसारख्या वैशिष्ट्यांमुळे तिचा लुक अत्यंत आकर्षक बनतो. बाईकमध्ये १९ इंचाचे चाके देण्यात आले असून त्यावर स्लिम टायर्स बसवण्यात आले आहेत. सीट हाइट ८२३ मिमी असून ग्राउंड क्लिअरन्स २०७ मिमी आहे, त्यामुळे भारतीय रस्त्यांसाठी ही बाईक योग्य मानली जाते.

तंत्रज्ञानाच्या बाबतीतही फ्लाइंग फ्ली सी६ अत्याधुनिक आहे. या बाईकमध्ये ३.५ इंचाचा गोल TFT टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये विविध फंक्शन्स आणि एनर्जी रिजनरेशनचे पर्याय उपलब्ध आहेत. याशिवाय १५ वॅट वायरलेस फोन चार्जिंग, २७ वॅट USB-C चार्जिंग पोर्ट आणि इलेक्ट्रॉनिक हँडलबार लॉक यांसारखी आधुनिक फीचर्स देण्यात आली आहेत. सेफ्टीच्या दृष्टीने पुढे आणि मागे डिस्क ब्रेक्ससोबत लीन-अँगल सेन्सिंग ABS आणि ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम दिली आहे.

परफॉर्मन्सच्या बाबतीत पाहता, या बाईकमध्ये ३.९१ kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी परमानेंट मॅग्नेट मोटरला पॉवर देते. ही मोटर २०.६ bhp पॉवर आणि ६० Nm टॉर्क निर्माण करते. फक्त १२४ किलो वजनामुळे ही बाईक ० ते ६० किमी प्रतितास वेग केवळ ३.७ सेकंदात गाठू शकते, तर तिचा टॉप स्पीड ११५ किमी प्रतितास आहे.

रेंजच्या बाबतीत कंपनीने १५४ किमीपर्यंतची रेंज (भारतीय ड्रायव्हिंग सायकल प्रमाणे) दिल्याचा दावा केला आहे. प्रत्यक्ष वापरातही ही रेंज चांगली राहण्याची शक्यता आहे. चार्जिंगसाठी २.२ kW ऑनबोर्ड चार्जर देण्यात आला आहे, जो १६ अँपिअर सॉकेटवर जोडल्यास बाईक सुमारे २ तास १५ मिनिटांत पूर्ण चार्ज होते. तसेच २० ते ८० टक्के चार्जिंग एका तासाच्या थोड्याच जास्त वेळेत पूर्ण होते. या बाईकमध्ये रॅपिड, स्टँडर्ड आणि ट्रिकल असे तीन चार्जिंग मोड्सही उपलब्ध आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande