अमरावतीत एसटी वाहकाचा खून; अकोली परिसरात खळबळ
अमरावती, 10 एप्रिल (हिं.स.) । महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात (एसटी -विभाग) वाहक म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तीचा अमरावतीत खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी (९ एप्रिल) रात्री सुमारे ८ वाजता ही घटना समोर आली असून, परिसरात एकच ख
अकोली परिसरात एसटी वाहकाचा खून काठीने जबर मारहाण


अमरावती, 10 एप्रिल (हिं.स.) । महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात (एसटी -विभाग) वाहक म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तीचा अमरावतीत खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी (९ एप्रिल) रात्री सुमारे ८ वाजता ही घटना समोर आली असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मृत व्यक्तीचे नाव किरण कमलाकर पुणतांबेकर (वय ४६, रा. अकोली) असे असून, ते एसटी विभागात वाहक म्हणून कार्यरत होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ते कर्तव्यावर गैरहजर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, पुणतांबेकर गुरुवारी सकाळी सुमारे ७ वाजता घरातून बाहेर पडले होते. सायंकाळी ५ ते साडेपाचच्या सुमारास अकोली येथील क्रिकेट मैदानाजवळील जुन्या गोदामाशेजारी त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या अंगावरील फुलपॅंट काढून काठीने मारहाण करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. घटनास्थळी तुटलेल्या काठीचे काही तुकडेही आढळले आहेत.

घटनेची माहिती मिळताच खोलापुरी गेट पोलीस ठाण्याचे अधिकारी दिलीप वडगावकर यांच्यासह गुन्हे शाखा व न्यायवैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले. मृताच्या वडील व पत्नीला घटनास्थळी बोलावण्यात आले असून, त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली.

या प्रकरणाबाबत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी सांगितले की, “प्रथमदर्शनी ही हत्या असल्याचे दिसत आहे.” मात्र, हत्या नेमकी कोणी आणि कोणत्या कारणामुळे केली, याचा अद्याप उलगडा झालेला नाही.

दरम्यान, पुणतांबेकर यांचे कुणाशीही वैर नव्हते आणि ते सहसा त्या मैदानावर जात नसत, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी व स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.-------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande