कर्नल श्रीकांत पुरोहित यांना ब्रिगेडियर म्हणून पदोन्नती
नवी दिल्ली, 10 एप्रिल (हिं.स.) : भारतीय सैन्याने कर्नल श्रीकांत पुरोहित यांना ब्रिगेडियर पदावर पदोन्नती देण्यास मंजुरी दिली आहे. कर्नल पुरोहित दीर्घकाळ कायदेशीर लढाई आणि वादांमध्ये अडकले होते. आता त्यांच्या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर त्यांना पदोन्
ब्रिगेडिअर श्रीकांत पुरोहित


नवी दिल्ली, 10 एप्रिल (हिं.स.) : भारतीय सैन्याने कर्नल श्रीकांत पुरोहित यांना ब्रिगेडियर पदावर पदोन्नती देण्यास मंजुरी दिली आहे. कर्नल पुरोहित दीर्घकाळ कायदेशीर लढाई आणि वादांमध्ये अडकले होते. आता त्यांच्या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर त्यांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कर्नल पुरोहित 31 मार्च 2026 रोजी निवृत्त होणार होते, मात्र सशस्त्र सेना न्यायाधिकरणाने (एएफटी) त्यांच्या पदोन्नतीच्या याचिकेचा विचार करून त्यांच्या निवृत्तीवर स्थगिती आणली होती. तब्बल 17 वर्षांच्या दीर्घ प्रवासानंतर कर्नल पुरोहित यांना मिळालेली ही पदोन्नती त्यांच्या आयुष्यात एक नवा टप्पा ठरू शकते. मालेगाव स्फोट प्रकरणात आरोपी राहण्यापासून ते वरिष्ठ कमांडर म्हणून पुन्हा आपले स्थान निर्माण करण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास आहे. त्यांना 2008 च्या मालेगाव स्फोट प्रकरणात अटक झाल्यानंतर त्यांची कारकीर्द पूर्णपणे थांबली होती. मात्र 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर ते सैन्याच्या सेवेत परतले, तरीही त्यांची ज्येष्ठता आणि पदोन्नती अनेक वर्षे प्रलंबित राहिली.

मुंबईतील विशेष एनआयए कोर्टाने 31 जुलै 2025 रोजी पुरोहित यांना सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्त केले. न्यायालयाने पुराव्यांचा अभाव आणि अभियोजन पक्षातील विसंगती यांचा उल्लेख केला होता. त्यानंतर सप्टेंबर 2025 मध्ये त्यांना पूर्ण कर्नल पदावर पदोन्नती देण्यात आली. कर्नल पुरोहित 31 मार्च 2026 रोजी निवृत्त होणार होते. मात्र 16 मार्च 2026 रोजी न्या. राजेंद्र मेनन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने निर्णय दिला की पुरोहित यांचा त्यांच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांप्रमाणे लाभ आणि पदोन्नती मिळण्याचा मजबूत दावा आहे. न्यायाधिकरणाने आदेश दिला की त्यांच्या तक्रारीचे निराकरण होईपर्यंत निवृत्ती स्थगित ठेवण्यात यावी. आता सैन्याने ब्रिगेडियर पदोन्नतीला दिलेली मंजुरी ही त्यांच्या कारकीर्दीत तुरुंगवास आणि खटल्यामुळे गेलेल्या वर्षांची काही प्रमाणात भरपाई मानली जाते. जर त्यांच्या कारकीर्दीत अडथळे आले नसते, तर त्यांच्या बॅचमधील सहकारी आता वरिष्ठ नेतृत्वाच्या पदांवर पोहोचले असते. सामान्य परिस्थितीत ते आतापर्यंत मेजर जनरल पदापर्यंत पोहोचू शकले असते.

----------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande