आदित्य ठाकरे यांनी कार्याध्यक्षपदाच्या चर्चांना फेटाळलं; “बातमीत काहीही तथ्य नाही”
मुंबई, 15 एप्रिल (हिं.स.)। शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर लवकरच पक्षाकडून मोठी जबाबदारी सोपवली जाणार असल्याच्या चर्चांनी आज राजकीय वर्तुळात जोर धरला होता. विशेषतः शिवसेना पक्षाच्या कार्याध्यक्षपदाची धुरा आदित्य
Aditya Thackeray Dismisses Speculation Regarding Executive President Post


मुंबई, 15 एप्रिल (हिं.स.)। शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर लवकरच पक्षाकडून मोठी जबाबदारी सोपवली जाणार असल्याच्या चर्चांनी आज राजकीय वर्तुळात जोर धरला होता. विशेषतः शिवसेना पक्षाच्या कार्याध्यक्षपदाची धुरा आदित्य ठाकरे यांच्याकडे दिली जाणार असल्याची माहिती काही माध्यमांतून समोर आली होती. मात्र या सर्व चर्चांवर स्वतः आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट शब्दांत पडदा टाकला आहे.

आदित्य ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, आज सकाळपासून काही टीव्ही चॅनेल्सवर त्यांच्या पक्षातील नव्या पदाबाबत बातम्या सुरू आहेत, मात्र या बातम्यांमध्ये कोणताही तथ्य नाही. पक्षात अशा प्रकारची कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट करत सर्व माध्यमांनी याची नोंद घ्यावी, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. त्यामुळे सकाळपासून सुरू असलेल्या या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

दरम्यान, याआधी अशी चर्चा होती की, १९ जून रोजी होणाऱ्या पक्षाच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. यामुळे पक्षात त्यांचे महत्त्व अधिक वाढेल आणि निर्णय प्रक्रियेत त्यांचा प्रभावही मोठ्या प्रमाणावर वाढेल, असे बोलले जात होते. २००३ साली ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांना पक्षाचे कार्याध्यक्ष करण्यात आले होते, त्याच धर्तीवर आदित्य ठाकरे यांना पुढे आणण्याची तयारी असल्याचे काही नेत्यांकडून संकेत दिले जात होते. या पार्श्वभूमीवर पक्षाची कार्यकारिणी बैठक बोलावून प्रस्ताव मांडला जाऊ शकतो, अशीही चर्चा रंगली होती.

या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी तरुण नेतृत्वाला संधी देण्याची गरज अधोरेखित केली. त्यांनी म्हटलं की, पुढील काळातील राजकारण हे तरुणांच्या हाती जाणे आवश्यक आहे आणि आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये चांगले काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा होत असेल, तर त्याचे स्वागतच केले पाहिजे.

एकूणच, पक्षातील नेतृत्वबदल आणि नव्या जबाबदाऱ्यांबाबत सुरू असलेल्या चर्चांना स्वतः आदित्य ठाकरे यांनीच स्पष्ट शब्दांत नकार दिल्यामुळे सध्या तरी या चर्चांना पूर्णविराम मिळालेला आहे. मात्र येत्या काळात शिवसेनेत कोणते राजकीय बदल घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande