
बीड, 15 एप्रिल, (हिं.स.)। बीड जिल्ह्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट घोंगावत असून हवामान विभागाने गुरुवार आणि शुक्रवारी 'ऑरेंज अलर्ट' जाहीर केला आहे. या काळात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होऊ शकतो. मागील काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यानंतर हा बदल होणार असला तरी, शेतकऱ्यांसाठी ही चिंतेची बाब आहे.
वादळामुळे कच्ची घरे, पत्र्यांचे शेड आणि झाडांना धोका निर्माण होऊ शकतो. हवामान खात्याने नागरिकांना पाऊस सुरू असताना झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत थांबणे टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच बाजार समित्यांमध्ये शेतमाल आणणाऱ्या शेतकऱ्यांनी ताडपत्री व संरक्षणाची योग्य व्यवस्था करावी, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. शनिवारी पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis