
रत्नागिरी, 15 एप्रिल, (हिं. स.) : पत्रकार दीपक भागवत यांना चिपळूण झालेल्या मारहाण प्रकरणात पोलिसांच्या तपासाला आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला असून, आरोपपत्र दाखल झाल्यानंतरही तपासाची पूरक प्रक्रिया सुरूच आहे. पत्रकारांनी केलेल्या मागणीनुसार पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांच्या मोबाइल कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) तपासण्याच्या दृष्टीने पोलिसांनी त्यांचा मोबाइल ताब्यात घेतला.
उपविभागीय पोलीस अधिकारी तथा तपास अधिकारी प्रकाश बेले यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता आणि सर्व बाजूंनी तपास पूर्ण व्हावा, या उद्देशाने संबंधित मोबाइल क्रमांकाचा सीडीआर मिळवण्यासाठी दूरसंचार कंपनीकडे अधिकृत अर्ज करण्यात आला आहे. सीडीआर अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील तपासाची दिशा अधिक स्पष्ट होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.दरम्यान, या प्रकरणात आधीच १० कर्मचाऱ्यांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून, सीसीटीव्ही फुटेज, ओळख परेड आणि साक्षीदारांचे जबाब यावर आधारित पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले आहेत. प्रशांत यादव यांच्या बाबतीत सीडीआर तपासात ते घटनास्थळी नसल्याचे स्पष्ट झाले. स्वप्ना यादव यांच्या संदर्भातील तपासामुळे या प्रकरणातील संभाव्य इतर पैलू समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पत्रकारांनी सुरुवातीपासूनच निष्पक्ष आणि सखोल तपासाची मागणी केली होती. त्यानुसार पोलिसांकडून प्रत्येक तांत्रिक पुराव्याची पडताळणी केली जात असल्याने तपासाबाबत विश्वास वाढत असल्याची प्रतिक्रिया काही पत्रकारांनी व्यक्त केली आहे.आरोपपत्र दाखल झाल्यानंतर आता न्यायालयीन प्रक्रियेला सुरुवात होणार असली, तरी पूरक तपासातून समोर येणारी माहितीही खटल्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे सीडीआर अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, या प्रकरणातील अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेतूनच स्पष्ट होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी