
रत्नागिरी, 15 एप्रिल, (हिं. स.) : अक्षयतृतीयेचा मुहूर्त हा अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी छुप्या मार्गाने बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामीण व शहरी भागात अक्षयतृतीयेला (19 एप्रिल) होणाऱ्या विवाह सोहळ्यांमध्ये बालविवाह होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनोज पाटणकर यांनी केले आहे.
आपल्या गावात किंवा परिसरात बालविवाह ठरला असल्यास किंवा होत असल्यास, त्याबाबतची माहिती चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक 1098 किंवा पोलीस विभागाच्या 112 या टोल फ्री क्रमांकावर द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात येत आहे.बालविवाह हा दखलपात्र गुन्हा असून, यात केवळ पालकांवरच नाही तर विवाह सोहळ्यात सहभागी होणारे वऱ्हाडी, भटजी, वाजंत्री, मंगल कार्यालय चालक आणि बिछायत केंद्र चालक यांच्यावरही गुन्हे दाखल होऊ शकतात. दोषींना 2 वर्षे सश्रम कारावास आणि 5 लाख रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते.
भारतीय कायद्यानुसार विवाहासाठी मुलाचे वय 21 आणि मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे. यापेक्षा कमी वयात विवाह केल्यास तो बालविवाह बेकायदेशीर ठरतो. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागात ग्रामसेवक, तर शहरी भागात बाल विकास प्रकल्प अधिकारी हे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. गावागावात सरपंच, पोलीस पाटील आणि अंगणवाडी सेविका यांनी सतर्क राहून विवाहापूर्वी वयाची खात्री करणे आवश्यक आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी