
रत्नागिरी, 15 एप्रिल, (हिं. स.) : वाढत्या तापमानामुळे आणि धरणातील झपाट्याने घटलेल्या पाणी साठ्यामुळे राजापूर शहरवासीयांना यंदा तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर राजापूर पालिकने आजपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे जाहीर केले आहे.
राजापूर शहराला सध्या कोदवली येथील सायबाच्या धरणातून तसेच शीळ येथील जॅकवेलद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने जलस्रोतांवरील पाण्याची पातळी सातत्याने खालावत आहे. त्यातच धरणाची दुरुस्ती व संबंधित कामे सुरू असल्याने उपलब्ध पाणीसाठ्यात आणखी घट झाली आहे. परिणामी, नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करणे प्रशासनासाठी आव्हानात्मक ठरत आहे.
या परिस्थितीचा विचार करून नगरपालिका प्रशासनाने पाणीपुरवठा सुरळीत राखण्यासाठी ‘एक दिवसाआड’ पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करून अधिक काळासाठी पाणीपुरवठा करता येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, राजापूरमधील काही भागांमध्ये पाणीपुरवठा महावितरण कंपनीच्या विद्युत वाहिन्यांवर अवलंबून आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास त्या भागांतील पाणीपुरवठ्यात व्यत्यय येण्याची शक्यता असल्याची माहितीही पालिकेने दिली आहे.
पालिका प्रशासनाने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले असून, अनावश्यक पाणी वाया घालवू नये, तसेच साठवणुकीची योग्य व्यवस्था करावी, असेही सूचित केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी