
छत्रपती संभाजीनगर, 15 एप्रिल (हिं.स.) । छत्रपती संभाजीनगर येथे विद्युत यंत्रणेच्या मॉन्सूनपूर्व देखभाल-दुरुस्तीची कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महावितरणचे कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर यांनी हे निर्देश दिले. महापारेषणच्या सभागृहात महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील अभियंते, अधिकारी आणि कंत्राटदारांची आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीस मुख्य अभियंता पवनकुमार कछोट, अधीक्षक अभियंते मनीष ठाकरे, संदीप दरवडे, संजय सरग यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी औंढेकर यांनी सांगितले की, पावसाळ्यात वादळ-वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी सर्व देखभाल व दुरुस्तीची कामे प्राधान्याने आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावीत.
बैठकीत विविध कार्यकारी अभियंते व अधिकाऱ्यांनी देखभाल कामांचा आढावा सादर केला. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी यंत्रणेने सज्ज राहण्याचेही निर्देश देण्यात आले.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis