
पुणे, 17 एप्रिल (हिं.स.)।
राज्यातील ऊस गाळप हंगाम अखेर संपला आहे. यंदा १ हजार ४५ लाख टन ऊस गाळपातून ९९ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. राज्यात सरासरी ९.४९ टक्के साखरउतारा मिळाला. हंगामाच्या सुरुवातीला १०६ लाख टन साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज असताना हंगामाच्या अखेरच्या काळात उसाला आलेले तुरे यामुळे उत्पादनात घट झाली. परिणामी साखरउतारा चांगला असतानाही प्रत्यक्ष साखर उत्पादन सात लाख टनांनी घटले आहे. मात्र, गेल्या गाळप हंगामाच्या तुलनेत यंदा १८ लाख टन साखर उत्पादन अधिक झाले आहे.
यंदा देशात सर्वाधिक साखर उत्पादन महाराष्ट्रात झाले आहे. त्याखालोखाल उत्तर प्रदेशात ८९ लाख टन, तर कर्नाटकमध्ये ४७ लाख टन साखर उत्पादित झाली. राज्यात यंदा एक नोव्हेंबर रोजी ऊस गाळप हंगामास सुरुवात झाली. त्यात १०३ सहकारी व १०७ खासगी अशा २१० कारखान्यांनी गाळपास सुरुवात केली. साधारण पाच महिन्यांच्या काळात राज्यात १ हजार ४५ लाख टन ऊस गाळपास उपलब्ध झाला. त्यातून ९.४९ टक्के उताऱ्यातून ९९ लाख १८ हजार टन साखर उत्पादित झाली.
सर्वाधिक २३ लाख टन साखर कोल्हापूर विभागातून तर त्या खालोखाल पुणे विभागात २२ लाख टन तर सोलापूर विभागात १९ साखर उत्पादित केली आहे. अहिल्यानगर विभागात ११ लाख टन, संभाजीनगरमध्ये १० व नांदेड विभागात ११ लाख टन साखर उत्पादित केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु