आठवडी बाजारांची भरारी; ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ
रायगड, 15 एप्रिल (हिं.स.) : रायगड जिल्ह्यात पारंपारिक आठवडी बाजारांनी पुन्हा एकदा जोरदार उभारी घेतली असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला यामुळे नवे बळ मिळताना दिसत आहे. “ग्राहक ते थेट शेतकरी” ही संकल्पना प्रभावीपणे राबवणारे हे बाजार आजही तितकेच महत्त्वाचे
From tradition to progress; Weekly markets support the economy


रायगड, 15 एप्रिल (हिं.स.) : रायगड जिल्ह्यात पारंपारिक आठवडी बाजारांनी पुन्हा एकदा जोरदार उभारी घेतली असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला यामुळे नवे बळ मिळताना दिसत आहे. “ग्राहक ते थेट शेतकरी” ही संकल्पना प्रभावीपणे राबवणारे हे बाजार आजही तितकेच महत्त्वाचे ठरत आहेत.

आधुनिक मॉल संस्कृतीचा प्रभाव वाढत असला तरी ग्रामीण भागात आठवडा बाजारांची लोकप्रियता कायम आहे. विशेषतः आरोग्यदायी आहाराकडे वाढता कल लक्षात घेता, प्रक्रिया न केलेला ताजा भाजीपाला आणि फळे थेट शेतातून बाजारात येत असल्याने ग्राहकांचा या बाजारांकडे ओढा वाढला आहे. कमी किमतीत ताजा आणि नैसर्गिक माल मिळत असल्याने हे बाजार ग्रामीण भागातील “शॉपिंग मॉल” ठरत आहेत.

सध्या जिल्ह्यात सुमारे १२८ लहान-मोठे आठवडा बाजार सुरू असून, गेल्या दोन वर्षांत त्यात सुमारे २० टक्क्यांची वाढ झाली आहे. प्रत्येक बाजाराची आठवड्याची उलाढाल सरासरी १० ते १५ लाख रुपयांपर्यंत पोहोचत आहे, तर काही मोठ्या बाजारांमध्ये ती ५० लाखांच्या घरात जात आहे. पर्यटकांची वाढती संख्या देखील या अर्थचक्राला गती देत आहे.

या बाजारांमुळे ग्रामपंचायतींनाही उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले आहे. दुकानाच्या आकारानुसार १० ते १०० रुपयांपर्यंत कर आकारला जातो, जो कायमस्वरूपी दुकानांच्या भाड्याच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. त्यामुळे लहान व्यावसायिक, महिला बचत गट, मच्छीविक्रेते आणि शेतकरी यांना व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत.

दरम्यान, ग्रामपंचायतींकडून शौचालय, पिण्याचे पाणी, वीज आणि पार्किंग यांसारख्या मूलभूत सुविधांवर भर दिला जात असून, काही ठिकाणी कायमस्वरूपी शेड उभारण्यात आल्या आहेत. फिरती दुकाने वाढल्याने विक्रेते आठवडाभर विविध बाजारांमध्ये माल विकून अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचत आहेत.

एकूणच, पारंपारिक आठवडा बाजारांनी ग्रामीण भागातील अर्थकारणाला नवसंजीवनी देत शेतकरी आणि ग्राहकांमधील दरी मोठ्या प्रमाणात कमी केली आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande