लातूरच्या अत्याधुनिक जिल्हा रुग्णालयाचा भूमिपूजन समारंभ १८ एप्रिल रोजी
लातूर, 15 एप्रिल (हिं.स.)। जिल्ह्यातील आरोग्य सेवेला मोठी चालना देणाऱ्या 900 खाटांच्या नवीन जिल्हा रुग्णालयाच्या इमारत बांधकामाचा भूमिपूजन समारंभ शनिवार, 18 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता पार पडणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत उभा
जिल्हा रुग्णालय


लातूर, 15 एप्रिल (हिं.स.)। जिल्ह्यातील आरोग्य सेवेला मोठी चालना देणाऱ्या 900 खाटांच्या नवीन जिल्हा रुग्णालयाच्या इमारत बांधकामाचा भूमिपूजन समारंभ शनिवार, 18 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता पार पडणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे लातूरसह आसपासच्या जिल्ह्यांतील रुग्णांना आधुनिक व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे.

हा समारंभ कृषि महाविद्यालय परिसर, नांदेड रोड येथील प्रस्तावित नवीन जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन होणार आहे.

कार्यक्रमाचे शुभहस्ते सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबिटकर उपस्थित राहणार आहेत. तसेच सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास आदी विभागांच्या राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

या सोहळ्यासाठी विविध लोकप्रतिनिधी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यामध्ये विधानपरिषद सदस्य विक्रम काळे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, विधानपरिषद सदस्य सतीश चव्हाण, आमदार अमित देशमुख, आमदार अभिमन्यु पवार, महापौर जयश्री सोनकांबळे, जिल्हा परिषद अध्यक्षा उषाबाई पाटील, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार रमेश कराड तसेच सभापती श्रीकांत बेंडे यांचा समावेश आहे.

प्रशासकीय स्तरावर जिल्हाधिकारी वर्षा वाडेगावकर, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना आणि महानगरपालिका आयुक्त मानसी मीना यांचीही उपस्थिती राहणार आहे. आरोग्य विभागातील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले आणि उपसंचालक (आरोग्य सेवा) डॉ. रेखा गायकवाड हे कार्यक्रमाच्या आयोजनात प्रमुख भूमिका बजावत आहेत.

या 900 खाटांच्या रुग्णालयामुळे लातूर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेत मोठी सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता आणि विविध विशेष उपचार विभाग यामुळे रुग्णांना स्थानिक स्तरावरच उच्च दर्जाची सेवा मिळणार आहे. त्यामुळे इतर शहरांकडे उपचारासाठी होणारी धावपळ कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande