परभणीत गुरुवारी शिक्षक सेनेचे ढोल-बजाव आंदोलन
परभणी, 15 एप्रिल (हिं.स.) : राज्यातील शिक्षण विभागाच्या कथित असंवेदनशील कारभाराविरोधात Maharashtra State Teachers Sena आक्रमक झाली असून, येत्या 16 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत परभणीतील शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर ढोल-बजाव आंदोलन करण्यात
परभणीत गुरुवारी शिक्षक सेनेचे ढोल-बजाव आंदोलन


परभणी, 15 एप्रिल (हिं.स.) : राज्यातील शिक्षण विभागाच्या कथित असंवेदनशील कारभाराविरोधात Maharashtra State Teachers Sena आक्रमक झाली असून, येत्या 16 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत परभणीतील शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर ढोल-बजाव आंदोलन करण्यात येणार आहे.

राज्यातील प्रलंबित प्रश्न, रखडलेले वेतन आणि प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणांविरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे. राज्याध्यक्ष आमदार ज. मो. अभ्यंकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी आंदोलन होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. परभणीतील आंदोलन विभागीय कार्याध्यक्ष बाळासाहेब राखे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.

शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांच्याविरोधातही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शिक्षण विभागाच्या निर्णयांमुळे राज्यातील हजारो शिक्षक आर्थिक व मानसिक अडचणीत सापडले असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

या आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन व थकीत वेतन, मार्च महिन्याचे रखडलेले वेतन, थकित देयके, बी.एल.ओ. कामातून शिक्षकांची मुक्तता, तसेच जुनी पेन्शन योजना लागू करणे यांचा समावेश आहे.

याशिवाय जी.पी.एफ. व वैद्यकीय बिलांचे प्रलंबित प्रस्ताव, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रकरणे तात्काळ निकाली काढणे आणि विनाअनुदानित शाळांबाबतचा निर्णय मागे घेणे अशा मागण्यांसाठीही आवाज उठवला जाणार आहे.

जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. ढोल-बजाव पद्धतीने निषेध नोंदवत सरकारचे लक्ष वेधण्याचा इशाराही आयोजकांनी दिला आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande