
नवी दिल्ली, 15 एप्रिल, (हिं.स.) - डेन्मार्कचा जागतिक बॅडमिंटनपटू आणि दोन वेळा ऑलिम्पिक व दोन वेळा विश्वविजेता याने व्यावसायिक बॅडमिंटनमधून व्हिक्टर ॲक्सेलसेन निवृत्ती जाहीर केली आहे. वयाच्या ३२ व्या वर्षी घेतलेला हा निर्णय क्रीडा जगतासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. पाठीच्या गंभीर दुखापतीमुळे व्हिक्टरने हा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन वर्षांपासून या दुखापतीमुळे त्याच्या कारकिर्दीवर मोठा परिणाम झाला होता.
व्हिक्टरने आपल्या निवृत्तीमागील कारण स्पष्ट केले आहे, की त्याचे शरीर आता त्याला खेळण्याची परवानगी देत नाही. इंस्टाग्रामवर आपल्या निवृत्तीची घोषणा करताना त्याने लिहिले, बहुतेक लोकांना माहीत आहे की, मी बऱ्याच काळापासून माझ्या पाठीच्या दुखण्याने त्रस्त आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये माझ्यावर शस्त्रक्रिया झाली, त्यानंतर मी मोठ्या प्रमाणावर पुनर्वसन केले, परंतु ऑक्टोबरमध्ये मला पुन्हा त्रास सुरू झाला. तेव्हापासून, मी आवश्यक पातळीवर खेळू किंवा सराव करू शकलो नाही. वेदनांमुळे मला खेळता आले नाही आणि म्हणूनच मला हा अत्यंत कठीण निर्णय घ्यावा लागला.
त्याने सांगितले की, त्याने आपल्या डॉक्टर्स आणि सर्जनचा सल्ला घेतल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. तो म्हणाला, मी माझ्या सर्जन आणि डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. ते म्हणतात की, मला सध्या होत असलेल्या वेदनांसाठी आणखी एका शस्त्रक्रियेची गरज भासू शकते. जर ती यशस्वी झाली नाही, तर अधिक गंभीर शस्त्रक्रिया करावी लागू शकते. तसे झाल्यास, मी त्याच स्तरावर स्पर्धा करू शकणार नाही. माझे शरीरच मला थांबण्याचा संकेत देत आहे आणि मला डॉक्टरांचा सल्ला पाळावाच लागेल.
ॲक्सेलसेनने अगदी लहान वयातच आपली प्रतिभा दाखवून दिली. २०१० मध्ये, त्याने BWF वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप जिंकून इतिहास रचला आणि असे करणारा तो पहिला युरोपियन बॅडमिंटनपटू ठरला होता. त्याच वर्षी, त्याने वरिष्ठ गटात पदार्पण केले आणि सायप्रस इंटरनॅशनलचे विजेतेपद जिंकून आपल्या कारकिर्दीची दमदार सुरुवात केली.
२०१४ मध्ये, त्याने स्विस ओपन ग्रँड प्रिक्स गोल्ड जिंकून आपली प्रतिष्ठा आणखी दृढ केली. त्याच वर्षी, त्याने BWF वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदकही जिंकले. २०१६ मध्ये, BWF वर्ल्ड सुपरसिरीज फायनल्समध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकणारा तो पहिला युरोपियन बॅडमिंटनपटू ठरून त्याने इतिहास रचला.
व्हिक्टरची ऑलिम्पिक कारकीर्द शानदार होती. त्याने २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये दिग्गज लिन डॅनला हरवून कांस्य पदक जिंकले. त्याने टोकियो २०२० मध्ये सुवर्णपदकही जिंकले. त्यानंतर त्याने २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपल्या विजेतेपद कायम राखले आणि सुवर्णपदक जिंकले. टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक जिंकणे ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोच्च कामगिरी होती, ज्यामुळे तो बॅडमिंटनचा सुपरस्टार म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याने २०१७ मध्ये ग्लासगो आणि २०२२ मध्ये टोकियो येथेही जागतिक विजेतेपद पटकावले आहे.
व्हिक्टरने दीर्घकाळ जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी होता. ऑक्टोबर २०२३ मध्ये, त्याने सलग १०० आठवडे अव्वल स्थानी राहण्याचा विक्रम प्रस्थापित केला. त्याने दोन जागतिक चॅम्पियनशिप, तीन युरोपियन चॅम्पियनशिप आणि थॉमस कपही जिंकले.
निवृत्तीची घोषणा करताना तो भावूक झालेला दिसला. तो म्हणाला, हा निर्णय घेणे अत्यंत कठीण होते आणि काही वेळा तर ते अन्यायकारक वाटले. पण माझ्या शरीराने अनेक वर्षे उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि अशा मोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याची व जिंकण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. फार कमी लोकांना असा अनुभव येतो. म्हणूनच मी माझ्या कारकिर्दीकडे प्रेमाने पाहतो.
ॲक्सेलसेनच्या निवृत्तीने बॅडमिंटनमधील एका युगाचा अंत झाला आहे. त्याची तंदुरुस्ती, तंत्र आणि सातत्य यामुळे तो आधुनिक काळातील महान बॅडमिंटनपटूंपैकी एक बनला. त्याच्या जाण्याने पुरुष एकेरीत एक मोठी पोकळी निर्माण होईल, जी भरून काढणे कठीण असेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे