
मुंबई , 17 एप्रिल (हिं.स.)।घातक गोलंदाजी आणि तुफानी फलंदाजीच्या जोरावर पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सचा सात विकेट्सने पराभव केला. गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या आयपीएल सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीस उतरलेल्या मुंबईने क्विंटन डिकॉकच्या शतकी आणि नमन धीरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 20 षटकांत सहा बाद 195 धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबने 16.3 षटकांत तीन बाद 198 धावा करत सामना जिंकला. वानखेडेवर पंजाबने मुंबईवर सहाव्यांदा विजय मिळवला. तसेच आयपीएलमध्ये मुंबईविरुद्ध पंजाबचा हा 18वा विजय ठरला.
सध्याच्या हंगामात पंजाबचा पाच सामन्यांतील हा चौथा विजय आहे. यापूर्वी कोलकाताविरुद्धचा एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. दुसरीकडे, मुंबईला सलग चौथ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. या विजयासह पंजाबचा संघ नऊ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला, तर आरसीबी दुसऱ्या स्थानावर घसरली.
196 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबला पहिला धक्का अल्लाह गजनफरने दिला. त्याने 27 धावांवर प्रियांश आर्या आणि दीपक चाहरला झेलबाद केले. तो नऊ चेंडूत 15 धावा करून माघारी परतला. त्यानंतर गजनफरने कूपर कोनोलीलाही बाद केले. तो 17 धावा करून बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि सलामीवीर प्रभसिमरन सिंह यांनी डाव सावरला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी विक्रमी 139 धावांची भागीदारी करत सामना मुंबईच्या हातातून काढून घेतला.
श्रेयस आणि प्रभसिमरन यांच्यातील ही भागीदारी आयपीएलमध्ये पंजाब किंग्ससाठी कोणत्याही विकेटसाठी चौथ्या क्रमांकाची सर्वोच्च भागीदारी ठरली. कर्णधार अय्यरने 35 चेंडूत 66 धावा केल्या, तर प्रभसिमरनने 39 चेंडूत नाबाद 80 धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय मार्कस स्टॉइनिस 10 धावांवर नाबाद राहिला. मुंबईकडून गजनफरने दोन, तर शार्दुल ठाकूरने एक विकेट घेतली.
त्याआधी मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली. रेयान रिकेल्टनला केवळ दोन धावांवर अर्शदीप सिंहने बाद केले. पुढच्याच चेंडूवर अर्शदीपने सूर्यकुमार यादवला खातेही न उघडता माघारी धाडले. मात्र त्यानंतर क्विंटन डिकॉक आणि नमन धीर यांनी डाव सावरत तिसऱ्या विकेटसाठी 68 चेंडूत 122 धावांची भागीदारी केली.
नमनने 31 चेंडूत 50 धावा केल्या. या खेळीत त्याने 161 च्या स्ट्राईक रेटने तीन चौकार आणि तीन षटकार लगावले. दुसरीकडे, डिकॉकने शानदार फलंदाजी करत आयपीएलमधील तिसरे शतक झळकावले. त्याने 60 चेंडूत नाबाद 112 धावा केल्या. या खेळीत त्याने 186 च्या स्ट्राईक रेटने आठ चौकार आणि सात षटकार मारले.
कर्णधार हार्दिक पंड्या फलंदाजीत विशेष चमक दाखवू शकला नाही. तो 12 चेंडूत 14 धावा करून मार्को यान्सेनचा बळी ठरला. शेरफेन रदरफोर्डला केवळ एक धाव करता आली, तर फलंदाजी क्रमात खाली पाठवलेल्या तिलक वर्माने तीन चेंडूत आठ धावा करून बाद झाला. पंजाब किंग्सकडून अर्शदीप सिंहने उत्कृष्ट गोलंदाजी करत तीन विकेट्स घेतल्या, तर शशांक सिंह आणि मार्को यान्सेन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode