लातूर - जळकोट तालुक्यात काही ठिकाणी पाणी टंचाई; टँकर सुरू करण्यास मंजुरी
लातूर, 15 एप्रिल (हिं.स.)जळकोट तालुक्यामध्ये आता उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागलेल्या आहेत. यासोबतच पाणीटंचाईची तीव्रता देखील वाढू लागलेली आहे. जळकोट तालुक्यातील वाडी तांड्यावर दरवर्षीच मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण होते. यावर्षी देखील एप्रिल महिन
पाणी पुरवठा


लातूर, 15 एप्रिल (हिं.स.)जळकोट तालुक्यामध्ये आता उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागलेल्या आहेत. यासोबतच पाणीटंचाईची तीव्रता देखील वाढू लागलेली आहे. जळकोट तालुक्यातील वाडी तांड्यावर दरवर्षीच मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण होते. यावर्षी देखील एप्रिल महिन्यामध्ये तालुक्यातील शिवाजीनगर तांडा व वाघमारी तांडा येथे पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. या दोन्ही तांड्यावर तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे जळकोट पंचायत समितीच्या वतीने टँकर सुरू करण्याचा प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात आला होता.

हा प्रस्ताव उपविभागी अधिकारी कार्यालय उदगीर येथे पाठवण्यात आला. उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांनी या दोन्ही तांड्यावर टँकर सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे आता या दोन्ही तांड्यावर दोन दिवसात टँकरने पाणीपुरवठा होणार आहे. जळकोट तालुक्यातील या दोन तांड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. शिवाजीनगर तांडा व वाघमारे तांडा या दोन ठिकाणी एका टँकर द्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. एकाच टँकरने दोन्ही तांड्यावर दोन टँकर ट्रिप पाणी टाकले जाणार आहेत. या टँकर साठी जळकोट तालुक्यातील चिंचोली येथील एका शेतकऱ्याच्या बोरचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे.

जळकोट तालुक्यामध्ये यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असे असताना देखील तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या पाणीटंचाईची भीती व्यक्त केली जात आहे. तालुक्यामध्ये परतीचा पाऊस म्हणावा तेवढा पडला नसल्यामुळे अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची शक्यता निर्माण झाली.

जळकोट तालुक्यामध्ये काही गावे व वाडी तांडे असे आहेत की त्या ठिकाणी कितीही पाऊस पडला तरीही उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी पाणीटंचाई जाणवतेच. जळकोट तालुक्यातील शिवाजीनगर तांडा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यामुळे या ठिकाणी प्रशासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासोबतच वाघमारी तांडा येथे देखील पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. या ठिकाणी देखील टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय जळकोट पंचायत समितीच्या प्रशासनाने घेतलेला आहे. तसा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो मंजुरीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय उदगीर प्रशासनाकडे आठ दिवसापूर्वी पाठविण्यात आला होता. या प्रस्तावास उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांनी मंजुरी दिली आहे.

या दोन्ही तांड्यावरील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत होती अखेर या दोन्ही तांड्यावर टँकर सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जळकोट तालुक्यामध्ये या उन्हाळयामध्ये पहिल्यांदाच टँकरद्वारे पाणीपुरवठा होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande