
सिंधुदुर्ग, 17 एप्रिल, (हिं. स.) : जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आणि नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समितीने येत्या २९ एप्रिल रोजी जनता आरोग्य दरबार आयोजित केला आहे.
आरोग्य दरबार हा असा मंच आहे की, जेथे सामान्य नागरिक आरोग्य क्षेत्रातील आपल्या समस्या, तक्रारी आणि सूचना थेट जिल्हा प्रशासनाचे मुख्य अधिकारी तसेच पालकमंत्री व पदाधिकाऱ्यांसमोर मांडू शकतात. या समस्यांचे निवारण कशा प्रकारे करता येईल हे समजून घेता येईल. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रातील असुविधांबाबतच्या तक्रारी दरबारात मांडता येतील. वैद्यकीय सेवा नाकारल्या गेल्या असल्यास त्याबद्दलची तक्रार, आरोग्य केंद्रांमधील कर्मचारी किंवा डॉक्टरांच्या अनुपस्थितीबाबत समस्या, आरोग्य व्यवस्थेत आवश्यक असलेल्या सुधारणांविषयी सूचना, मध्यरात्री औषधे बाहेरून आणायला लावणे, उपजिल्हा रुग्णालय असा दर्जा असताना देखील छोट्या गोष्टींसाठी जिल्हा रुग्णालय अगर गोवा येथे पाठविणे असे रुग्णालयात आलेले अनुभवदेखील लिखित स्वरूपात मांडता येतील. नागरिकांना आलेले अनुभव अधिकाऱ्यांसमोर प्रत्यक्ष उपस्थित राहून मांडता येतील. त्यावर काय उपाययोजना होईल हे समजून घेता येईल.
नागरिकांचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
निवेदन किंवा तक्रार जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या नावे लेखी स्वरूपात तयार करावी. हे निवेदन १९ एप्रिल २०२६ पर्यंत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समिती कार्यालय, राजू केळुसकर, संजय स्टोअर्स, आदिनारायण मंगल कार्यालयाशेजारी, सालईवाडा, सावंतवाडी येथे पाठविता येईल. अधिक माहितीसाठी 7083974400 किंवा
कृती समिती निमंत्रक एन. बी. रेडकर (9422381730), रवी जाधव (9405264027), श्रीमती रूपा मुद्राळे (9422633971) यांच्याशी संपर्क साधावा.
आरोग्यजनता दरबार बुधवार, २९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता सावंतवाडीच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात भरेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी