
रायगड, 17 एप्रिल (हिं.स.) : रसायनी पोलीस ठाणे हद्दीत आपटा-दांडफाटा मार्गावर घडलेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.Raigad येथील आपटा-दांडफाटा रस्त्यावर रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा नातेवाईक स्प्लेंडर मोटारसायकलने (क्रमांक एमएच-46 डीडी 1480) आपटा येथे हळदीच्या कार्यक्रमासाठी जात होते. दरम्यान, वळणावर मोटारसायकल घसरून दोघेही रस्त्यावर पडले.
या अपघातात फिर्यादी जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे. मात्र, त्यांच्यासोबत असलेला नातेवाईक रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत असतानाच एक अनोळखी टेम्पो त्याच्या अंगावरून गेल्याची धक्कादायक घटना घडली.
टेम्पोच्या खाली कपडे अडकून संबंधित व्यक्तीला सुमारे 3 किलोमीटरपर्यंत फरफटत नेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 60/2026 नोंदवण्यात आला असून भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार टेम्पो चालकाचा शोध सुरू असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
--------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)