
मुंबई, 15 एप्रिल (हिं.स.)भारतीय फुटबॉलचा दिग्गज सुनील छेत्रीने प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सच्या सराव सत्राला हजेरी लावली. कर्णधार हार्दिक पांड्याने छेत्री यांना मुंबईची जर्सी भेट दिली. सराव सत्रादरम्यान MI चे अनेक खेळाडू छेत्री यांच्याशी संवाद साधताना दिसले. छेत्री यांनी महेला जयवर्धने, शार्दुल ठाकूर, दीपक चहर आणि कर्णधार हार्दिक पांड्या यांसारख्या क्रिकेटपटूंशी संवाद साधला आणि आपल्या शानदार कारकिर्दीतील अनुभव सांगितले.
या भेटीनंतर छेत्री म्हणाला, मी स्टेडियमवर फार वेळा आलो नाही, पण जेव्हा जेव्हा आलो आहे, तेव्हा ती एक अद्भुत भावना असते. येथे येऊन खेळ एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणे खूप छान आहे. मी मुंबई इंडियन्स आणि चाहत्यांना केवळ या सामन्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो.
मुंबईने आयपीएल २०२६ मध्ये शानदार सुरुवात केली. संघाने २०१२ नंतर कोणत्याही हंगामातील आपला पहिला सामना जिंकला, पण त्यानंतर त्यांना एकही सामना जिंकता आलेला नाही. चार सामन्यांमध्ये तीन पराभवांसह मुंबई गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे.
संघ आपला शेवटचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु विरुद्ध १८ धावांनी पराभूत झाला होता. त्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्मा दुखापतग्रस्त होऊन निवृत्त झाला. त्या सामन्यात शरफेन रदरफोर्डने मुंबई इंडियन्ससाठी एक शानदार खेळी केली, त्याने ३१ चेंडूंमध्ये नऊ षटकारांच्या मदतीने ७१ धावा केल्या. पण रदरफोर्ड आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. मुंबई इंडियन्सचा पुढील सामना गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर पंजाब किंग्सविरुद्ध आहे. मुंबई इंडियन्ससाठी या सामन्यातील विजय अत्यंत महत्त्वाचा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे