
-आता जर्मन-दक्षिण आफ्रिकन मॉडेलचा केला फोटो लाईक
मुंबई, 17 एप्रिल (हिं.स.)। भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली सध्या सोशल मीडियावर चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून आयपीएलमध्ये खेळणाऱ्या कोहलीने जर्मन-दक्षिण आफ्रिकन ट्रॅव्हल व्लॉगर आणि गायिका LizLaz हिच्या इन्स्टाग्राम पोस्टला ‘लाईक’ केल्यामुळे सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ उडाला आहे. या घटनेनंतर चाहत्यांमध्ये आणि नेटिझन्समध्ये विविध चर्चा रंगताना दिसत आहेत. इन्फ्लुएन्सरने 30 जानेवारीला एक फोटो पोस्ट केला होता. त्यावर विराटचं लाइक आहे.
हा लाईक चुकून झाला की इन्स्टाग्रामकडून काही तांत्रिक त्रुटी झाली, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या घटनेमागचे नेमके कारण काय, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान, LizLaz ही बहुभाषिक व्यक्ती असून ती जर्मन, इंग्रजी आणि डच भाषा अस्खलितपणे बोलते. विशेष म्हणजे तिने हिंदीसह अनेक भारतीय प्रादेशिक भाषा देखील शिकल्या आहेत, ज्यामुळे तिचे भारतीय प्रेक्षकांमध्ये मोठे आकर्षण आहे.
LizLaz चे खरे नाव जेनिफर असून ती जर्मनीमध्ये वास्तव्यास आहे. तिने मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे आणि विविध संस्कृती आकर्षक पद्धतीने मांडणे हे तिचे वैशिष्ट्य मानले जाते. तिचे व्हिडिओ विशेषतः बंगळुरु, मुंबई आणि दिल्लीसारख्या शहरांमध्ये स्थानिकांशी संवाद साधताना दिसतात, त्यामुळे ती भारतीय सोशल मीडिया युजर्समध्ये लोकप्रिय झाली आहे.
तिच्या लोकप्रियतेबरोबरच तिच्या आर्थिक स्थितीबाबतही चर्चा होत असून तिची एकूण मालमत्ता सुमारे 8 ते 10 कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. विशेष म्हणजे LizLaz ही स्वतः विराट कोहलीची चाहती असल्याची माहितीही समोर आली आहे. एका मुलाखतीत तिने कोहली हा आपला आवडता क्रिकेटपटू असल्याचे सांगितले होते. अशातच तिच्या पोस्टवर कोहलीने दिलेल्या लाईकमुळे ही चर्चा अधिकच रंगली आहे.
यापूर्वीही विराट कोहलीकडून अभिनेत्री अवनीत कौर हिच्या पोस्टला लाईक झाल्याची घटना घडली होती. त्या वेळीही इन्स्टाग्राममधील तांत्रिक त्रुटीमुळे असे झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे सध्याच्या घटनेबाबतही अशीच शक्यता व्यक्त केली जात असली, तरी अधिकृत स्पष्टीकरण मिळेपर्यंत या चर्चांना पूर्णविराम मिळणार नसल्याचे दिसत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule