
लातूर, 17 एप्रिल (हिं.स.)। देवणी तालुक्यातील सहा वर्षांच्या निरागस बालिकेवर झालेल्या अत्याचार प्रकरणात उदगीर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने दिलेला निकाल हा न्यायव्यवस्थेच्या कणखरपणाचा ठोस पुरावा ठरला आहे. या प्रकरणातील आरोपी अल्ताफ महेबुब खुरेशी (वय २०) याला न्यायालयाने नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेप तसेच ५० हजार रुपयांचा दंड अशी कठोर शिक्षा सुनावली. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीकडूनच बालिकेवर वारंवार अत्याचार झाल्याची बाब समोर आल्यानंतर समाजात संतापाची लाट उसळली होती. जानेवारी २०२४ मध्ये घडलेल्या या घटनेत आरोपीने बालिकेला फसवून नेऊन तिच्यावर अमानुष कृत्य केले होते. पीडितेने आईला सांगितल्यानंतर प्रकरण उघडकीस आले आणि देवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पूर्ण करून मजबूत पुराव्यांसह न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या खटल्याची सुनावणी सत्र न्यायाधीश डी. बी. म्हालाटकर यांच्या न्यायालयात झाली. सरकारी वकील अॅड. एस. आय. बिरादार यांनी साक्षीदारांचे जबाब आणि भक्कम पुरावे सादर करत आरोपीविरुद्ध ठोस बाजू मांडली. न्यायालयाने सर्व बाबींचा बारकाईने विचार करत आरोपीला पोक्सो कायद्याच्या कलम ६ अंतर्गत दोषी ठरवले. निकाल देताना न्यायालयाने स्पष्ट शब्दांत नमूद केले की, इतक्या लहान बालिकेवर शेजाऱ्याने केलेला अत्याचार हा अत्यंत गंभीर आणि समाजमनाला हादरवणारा गुन्हा आहे, त्यामुळे कोणतीही सहानुभूती दाखवण्याचा प्रश्नच येत नाही. परिणामी आरोपीला मरेपर्यंत तुरुंगात ठेवण्याचा कठोर निर्णय देण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis