रत्नागिरी : बेपत्ता वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला कुजलेल्या अवस्थेत
रत्नागिरी, 17 एप्रिल, (हिं. स.) : कोळंबे पूरक सडा (ता. संगमश्वर) येथील जंगलात गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, द्रौपदी पांडुरंग
रत्नागिरी : बेपत्ता वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला कुजलेल्या अवस्थेत


रत्नागिरी, 17 एप्रिल, (हिं. स.) : कोळंबे पूरक सडा (ता. संगमश्वर) येथील जंगलात गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, द्रौपदी पांडुरंग पडवळ (वय ७५, रा. कोळंबे भरणकरवाडी, ता. संगमेश्वर) असे मृत महिलेचे नाव आहे. द्रौपदी पडवळ यांना विसरभोळेपणाचा आजार होता. याच आजारामुळे त्या ३१ मार्च २०२६ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेल्या होत्या. त्या घरी न परतल्याने नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र त्या सापडल्या नाहीत. अखेर ३१ मार्च रोजीच संगमेश्वर पोलीस ठाण्यात त्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

पोलीस आणि नातेवाईक गेल्या १५ दिवसांपासून त्यांचा शोध घेत होते. दरम्यान, १६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास कोळंबे पूरक सडा या जंगलमय भागातील झाडीझुडपांमध्ये एक मृतदेह असल्याची माहिती समोर आली. घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, तो मृतदेह बेपत्ता असलेल्या द्रौपदी पडवळ यांचाच असल्याचे निष्पन्न झाले.

दीर्घ काळ उलटल्यामुळे मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता. विसरभोळेपणामुळे जंगलात वाट चुकल्याने किंवा अन्य कारणाने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. याबाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यात १६ एप्रिल रोजी रात्री आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande