
परभणी, 17 एप्रिल (हिं.स.)। राज्य परिवहन महामंडळाच्या परभणी आगारातील वाहतूक निरीक्षकाने रजा मंजूर करून देण्यासाठी लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला असून, लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सापळा रचून संबंधित अधिकार्याला रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे परिवहन विभागात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परभणी आगारात कार्यरत असलेल्या 35 वर्षीय चालकाने मित्राच्या लग्नासाठी एक दिवसाची रजा मंजूर करून घेण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, ही रजा मंजूर करण्यासाठी वाहतूक निरीक्षक रतन नामदेव शेलार (वय 47) यांनी तक्रारदाराकडे 500 रुपयांची लाच मागितली.
याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार दाखल केली. 16 एप्रिल रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाईत शेलार यांनी पंचांच्या समक्ष लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर लगेचच सापळा रचण्यात आला. त्याच दिवशी बस स्थानक परिसरातील कार्यालयात सापळा कारवाई करण्यात आली. या वेळी शेलार यांनी तक्रारदाराकडून 500 रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.
या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, 1988 अंतर्गत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच त्याच्या मोबाईलची तपासणी आणि घरझडतीची कार्यवाहीही सुरू आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक महेश पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मनीषा पवार करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis