
जळगाव, 17 एप्रिल (हिं.स.) जळगाव जिल्हा पोलीस दलात नुकतेच लाच प्रकरणी अटक केलेल्या शनिपेठ पोलीस ठाण्यातील पोलीस नाईकाला थेट बडतर्फ केले आहे, तर पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिनाभरापूर्वी दोन गटात मोठी हाणामारी झाली होती. ही घटना ताजी असतानाच, अवघ्या तीन दिवसांपूर्वी पोलीस नाईक विनोद अहिरे याला १ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. एकापाठोपाठ घडलेल्या या घटनांमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
या प्रकरणांची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी लाच प्रकरणात अटक झालेल्या पोलीस नाईक विनोद अहिरे यास तात्काळ बडतर्फ केले असून पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहेतसेच शनिपेठ पोलीस ठाण्याचा पदभार सहाय्यक पोलीस निरीक्षक साजीद मन्सुरी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. दरम्यान, आज डॉ. महेश्वर रेड्डी यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांची गुन्हे आढावा बैठक घेतली. जिल्ह्यातील संवेदनशील घटनांचा आढावा घेत त्यांनी काही अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर