
- पोलिस चौकशीत होत आहेत धक्कादायक खुलासे
अमरावती, 17 एप्रिल (हिं.स.) : परतवाडा परिसरात तरुणींच्या लैंगिक शोषण आणि आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणात नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपींमध्ये तरुणींना फसवण्याची आणि अधिक मुलींना आकर्षित करण्याची स्पर्धा सुरू असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद आणि त्याचा साथीदार उझेर खान यांच्यात अशी ‘शर्यत’ सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या दरम्यान आरोपी अयान अहमद तरुणींशी केलेल्या कृत्यांचे व्हिडिओ तयार करून उझेर खानला पाठवत असल्याचेही समोर आले आहे.
पुढे दोघांमध्ये आर्थिक वाद निर्माण झाल्यानंतर उझेर खानने संबंधित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे संपूर्ण प्रकार उघडकीस आला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
पोलिस तपासात असेही समोर आले आहे की, आरोपींनी भाड्याच्या खोल्यांचा वापर करून तरुणींवर अत्याचार केल्याचा संशय आहे. मुख्य आरोपी अयान अहमद (रा. परतवाडा) याने चौकशीदरम्यान काही गुन्ह्यांची कबुली दिल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात त्याच्या एका मित्राची खोली काही वेळेसाठी वापरली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर संबंधित व्यक्तीलाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणात आतापर्यंत एकूण आठ जणांना अटक करण्यात आली असून, त्यापैकी काही आरोपींनी व्हिडिओ व्हायरल करण्यात सहभाग घेतल्याचा आरोप आहे. अजूनही काही संशयितांची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पीडित तरुणी अद्याप पुढे आलेल्या नसल्या तरी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपासाला दिशा मिळत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी