
चंदीगड, 18 एप्रिल (हिं.स.)। पंजाब पोलिसांच्या काउंटर इंटेलिजन्स विंगने सीमापार सुरू असलेल्या तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश करत सुमारे 450 कोटी रुपये किंमतीचे 64.62 किलोग्रॅम हेरॉइन जप्त करून दोन तस्करांना अटक केली आहे. ही गँग पाकिस्तानी तस्कर मूसा याच्याकडून चालवली जात होती. मूसा काही वर्षांपूर्वी भारतात तेव्हा चर्चेत आला होता, जेव्हा कस्टम विभागाने येथे अटारी-बाघा सीमेवर एका मालगाडीतून 532 किलो हेरॉइन जप्त केले होते.
पंजाब पोलिसांचे महासंचालक गौरव यादव यांनी शनिवारी सांगितले की, अमृतसरमध्ये पंजाब पोलिसांच्या काउंटर इंटेलिजन्स विंगच्या स्टेट स्पेशल ऑपरेशन सेलने ही कारवाई केली आहे. त्यांनी सांगितले की, पोलिस तपासात उघड झाले आहे की हे हेरॉइन पाकिस्तानमधून आणले गेले होते, जे पुढे पुरवठा करण्यासाठी तयार होते. पोलिसांनी त्याआधीच हे पकडले आहे. तपासात हेही समोर आले आहे की या नेटवर्कचे धागेदोरे परदेशात बसलेल्या हँडलर्स आणि पाकिस्तानातील मूसा गँगशी जोडलेले आहेत. हा गट सीमेपलीकडून अमली पदार्थांची तस्करी करून पंजाब आणि इतर राज्यांमध्ये पुरवठा करण्याचे काम करत होता.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख सरवन सिंह गुर्जर (राहणार अवा गाव) आणि शमशेर सिंह (राहणार इकतियारनगर गाव) अशी झाली आहे. दोघांना माहल गावाजवळून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिस स्टेशन एसएसओसी अमृतसर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जलदगतीने सुरू आहे. पोलिस महासंचालकांनी सांगितले की, पोलिसांचे उद्दिष्ट या संपूर्ण नेटवर्कच्या मुळापर्यंत पोहोचणे आणि त्यातील सर्व सहकाऱ्यांना अटक करणे आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule